नाशिक – मनाने तरुण असलेल्या दोन ज्येष्ठांनी नर्मदा परिक्रमेसाठी प्रयाण केले आहे. संतोष भांड (७९),राजेंद्र जोशी (७५) हे दोघेजण ‘ नर्मदे हर ‘ या जयघोषात रवाना झाले. शंकराचार्य न्यासाचे अशोक खोडके, जयंत चांदवडकर यांनी दोघांना पुष्पगुच्छ देऊन नाशिकरांच्यावतीने शुभेच्छा दिल्या. ओंकारेश्वर येथे पोहोचल्यावर आज पायी परिक्रमेला प्रारंभ होईल. एकूण साडेतीन हजार किमीच्या खडतर पदभ्रमणाला सुमारे सहा महिने लागतील असा अंदाज आहे. दररोज साधारणपणे २० ते ३० किमी. चालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी परिक्रमा केली. त्यापासून प्रेरणा घेऊन भांड आणि जोशी यांनी आपले नर्मदा परिक्रमेचे स्वप्न त्वरित सत्यात आणण्याचे ठरवले. आयुष्यात एकदा तरी पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प त्यांनी फार पूर्वीच केला होता. तो आता प्रत्यक्षात आला आहे. संतोष भांड एचएएल मध्ये ३५ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाले. राजेंद्र जोशी शंकराचार्य न्यास संचलित मोरोपंत पिंगळे गोशाळेचे व्यवस्थापक आहेत. ५ दिवसांपूर्वीच त्यांनी जाण्याचे निश्चित केले. काल या दोघांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी भांड, देवधर परिवारातील तसेच शंकराचार्य न्यासाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी संतोष भांड म्हणाले,जाणीवपूर्वक, डोळसपणे व पूर्ण श्रद्धेने परिक्रमा करण्याचा मानस आहे. हेतू कोणताच नाही किंवा नर्मदा मय्याकडे काहीही मागणे नाही. पूर्वतयारीसाठी जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदे हर, भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा या पुस्तकांची अक्षरशः पारायणे केली होती. चालण्याचा सराव केला होता. राजेंद्र जोशी म्हणाले, मनाचे उन्नयन, सबलीकरण व निर्मलिकरण व्हावे अशा इच्छेने या आनंदयात्रेसाठी पहिले पाऊल उचलले आहे.शक्य तेवढे चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाईलाजाने वाटेवर गरज पडली तर वाहनाचा आधार घेऊ. नर्मदा मय्येने बोलावले आहे. तीच काळजी घेऊन परिक्रमा पूर्ण करून घेईल हा विश्वास वाटतो.सौ. सरिता भांड म्हणाल्या, दोघेही वयोवृद्ध असले तरी तब्येती चांगल्या आहेत.कोणतेही आजार किंवा व्याधी नाहीत. त्यांची जिद्द, तळमळ आणि उत्साह लक्षात घेऊन आम्ही परवानगी दिली.