मनमाड – नांदगांव तालुक्यामधील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार, रविवार व सोमवार (जनता कर्फ्यू) या बंदच्या कालावधीमध्ये शहरातील फक्त औषधांची दुकाने (मेडीकल स्टोअर्स) हे नियमित सुरु असतील व दुध विक्री ही फक्त सकाळी ७ ते ९ व सायं.७ ते ९ या कालावधीत सुरु असेल. व या व्यतिरीक्त मनमाड शहरातील इतर संपूर्ण दुकाने बंद राहतील. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व सदरच्या बंद च्या कालावधीमध्ये शहरातील सर्व नागरीक व व्यापारी वर्गाने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा पद्मावती जगन्नाथ धात्रक यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे यांचे मार्गदर्शनानुसार कोविड-19 ची साखळी तोडण्याच्या दृष्टीने मनमाड नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांची गुरुवारी सायं.४ वाजता बैठक आयोजित करण्यांत आलेली होती. सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद वार असतील तर सोमवार २२ मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून मनमाड शहर बंद घोषीत करणेबाबतचा निर्णय घेण्यांत आलेला आहे.
तसेच सदर कालावधीमध्ये उपाय योजना म्हणून मनमाड नगरपरिषदेमार्फत विविध पथकांची नियुक्ती केलेली असुन कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम आयसोलेट केलेले आहे. व अशा प्रकारचे बाधीत झालेले रुग्ण शहरात इतरत्र फिरतांना आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना सक्ती कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यांत येईल. तसेच कोरोना बाधीत रुग्ण शहरात फिरतांना आढळल्यास ग्रामीण रुग्णालय अथवा मनमाड नगरपरिषद कार्यालयाशी नागरीकांनी संपर्क साधावा. अशा नागरीकांच्या नावांची गुप्तता पाळण्यात येईल. तरी सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही धात्रक यांनी केले.