मनमाड- शहरावर एखादे संकट आल्यानंतर त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वजण एकजूट झाले तर संकटावर मात करता येवू शकते. असेच काहीसे चित्र मनमाड शहरात दिसून येत आहे. सध्या देश-विदेशात कोरोनाने थैमान घातले असून मनमाड शहरात देखील कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. अनेक जण कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे पाहून शासकीय यंत्रणे सोबत शहरातील अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या मदतीला सरसावले आहे. त्यांनी मनमाडला कोरोना मुक्त करण्याचा चंग बांधत सर्व डॉक्टर आपले जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करीत आहे.
सध्या शहरात ६७२ रुग्ण असून त्यापैकी तब्बल ६२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी तब्बल ९५ टक्के इतकी असल्याने ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे. १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. मनमाड शहरात २ मे रोजी कोरोनाची एंन्ट्री झाली त्यानंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत गेली. सर्वासाठी हा आजार नवीन असल्यामुळे सुरुवातीला सर्वांचाच गोंधळ उडाला होता. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासन,पोलीस अधिकारी,कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी,आरोग्य विभाग या सर्वांनी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यांना जनता,लोकप्रतिनिधी,यांची पुरेपूर साथ मिळाली. त्यामुळे २६ जून शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शहरात जनता कर्फ्यू, सम-विषम पद्धत, आठवड्यात एक दिवस सर्व व्यवहार बंद अशा उपयायोजना करण्यात आल्या. मात्र तरी देखील दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत होती.अगोदर शहरातील गरीब आणि झोपडपट्टी भागात रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यानंतर शहरातील गावठाण भाग आणि श्रीमंत वस्तीत सोबत रुग्णावर उपचार करणारे उपजिल्हा रुग्णालय पाठोपाठ बाजार समिती,वीज वितरण कार्यालय,एफसीआय,नगरपरिषद,विविध बँका मध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला. सुमारे १५ नगरसेवकांसोबत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार कोरोना बाधीत झाले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. नागरीक ही भयभीत झाले होते. मनमाड शहरात सुमारे १४० डॉक्टर असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून सर्वच खाजगी डॉक्टर मैदान उतरले व त्यांनी रुग्णावर उपचार करण्यास सुरुवात केली. उपचार करीत असताना काही खासगी डॉक्टरांसोबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरवणे, डॉ.गोरे हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले मात्र आपल्या आपल्या जीवाची पर्वा न करता शहराला कोरोना मुक्त करण्याचा ध्येय डोळ्या समोर ठेवून हे डॉक्टर रुग्णावर अविरत उपचार करीत आहे. काही डॉक्टर तर सकाळ पासून रात्री पर्यंत सेवा देता आहे. या सर्व डॅाक्टरांचे कौतुक होत आहे. कोरोना यौध्दाच्या यादीत या डॅाक्टरांचा वाटाही तितकाचा मोठा असणार आहे.