मनमाड – मनमाड-औरंगाबाद,मनमाड दौंड या मार्गावर असलेले रेल्वे गेट बंद करून त्याजागी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत पाणी साचत असल्यामुळे त्यातून वाट काढणे जिकरीचे झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या मार्गावरील आसपासच्या गावातील नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब मिसर यांनी दिली आहे.
रेल्वे प्रशासनाने देशभरातील ३० हजार रेल्वे फाटक बंद करून त्यांच्याजागी भुयार मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनमाड शहरातील २८ युनिट जवळ असलेल्या औरंगाबाद व दौंड मार्गावरील फाटक बंद करून त्याजागी भुयारी मार्ग करण्यात आले.रेल्वे मार्गावर असलेल्या फटकाच्या दुसऱ्या बाजूला माळेगाव,वंजारवाडी,सटाणे, बेजग व, भालुर,क-ही, एकोळी, घाडगेवाडी, निशाणवाडी,मोहेंगाव आदी गावे असून या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचा मनमाड शहरा सोबत व्यवहार व संपर्क असून अनेक ग्रामस्थ मनमाडला विविध कामांसाठी येत असतात.
सकाळी ते मनमाडला येतात आणि सायंकाळी परत जातात. शेतकरी वर्ग हा ट्रक, टॅक्टरसह इतर वाहनातून धान्य, कांदे,भाजीपाला यासह इतर शेतमाल घेवून बाजार समितीत येतो. तर असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी मनमाडच्या शाळा,विद्यालय आणि महाविद्यालयात येतात. त्यांच्यासाठी एसटीत सवलत असल्याने हे गोरगरीब विद्यार्थी एसटीनेच प्रवास करतात. भुयारी मार्ग तयार करतांना त्यातून एसटीसह इतर मोठे वाहन जाणार की नाही याची काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे फटका गावात येणारी-जाणारी एसटी बंद झाली आहे. शिवाय या मार्गातून ,टॅक्टरसह इतर वाहनाना वळविण्यास ( टर्न मारण्यास) तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर भुयारी मार्गात गुडघ्या एवढे पाणी साचू लागले आहे. एकूणच हा भुयारी मार्ग या भागातील अनेक गावाच्या हजारो नागरिक असंख्य विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे.