मनमाड -पुणे, नाशिक नंतर पाठोपाठ मोटारसायकल जाळण्याचे लोण मनमाड पर्यंत पोहचले असून अज्ञात समाज कंटकांनी शहरातील आययुडीपी भागात धुमाकूळ घालत घरा बाहेर उभ्या असलेल्या ३ मोटरसायकली जाळल्या तर एका अॅपेरिक्षाचे तोडफोड करून फरार झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील इदगाह भागात योगेश शर्मा यांनी त्यांच्या घराबाहेर ३ मोटारसायकली आणि एक अॅपे रिक्षा उभी करून ठेवली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकांनी तिन्ही मोटारसायकली पेटून दिल्या तर रिक्षाची तोडफोड करून फरार झाले. एका व्यक्तीने मोटारसायकली जळत असल्याचे पाहून त्याने शर्मा यांना झोपेतून उठविले. घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या तिन्ही मोटारसायकली जळत असल्याचे पाहून शर्मा यांनी तातडीने आगविझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. या प्रकरणी शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर देखील शहरात दोन वेळा मोटारसायकल जाळण्याचे प्रकार घडले असून हा प्रकार दहशत निर्माण करण्याचा असल्याची चर्चा आहे.