मनमाड – नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे ज्ञानेश्वर वसंत घुगे या शेतकऱ्याची शेतात काढून ठेवलेली मका पोळीला अज्ञात व्यक्तीने आग लावली असून त्यात मका मोठ्या प्रमाणात जळाली आहे.त्यामुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तळवाडे येथील शेतकरी ज्ञानेश्वर घुगे यांनी अडीच एकरामध्ये मका हे पीक घेतले होते.मका काढून शेतामध्ये उन्हामध्ये वाळत घातली होती व ती आज मका यंत्राद्वारे काढून उद्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेण्यात येणार होती. मात्र त्यातच आज अज्ञात कोणीतरी खोडसाळ वृत्तीच्या व्यक्तीने त्या कांदा पोळीला आग लावली आहे.त्यात मका जळाली आहे.सुमारे शंभर क्विंटल मकाची होती. मका जळाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरची घटना मंगळवारी दुपारी घडली असल्याने गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये मात्र या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत या सजाचे तलाठी यांना वारंवार फोन करूनही ते पंचनामा करण्यासाठी त्यांनी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप पसरला आहे. सदर शेतकऱ्याला याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.