मनमाड – शासनाकडून मनमाड नगर परिषदेला संकुल उभारण्यासाठी आलेले ४ कोटी रुपयांचा निधी शहरासाठी महत्त्वाची असलेल्या करंजवण पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावा यासाठी कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घेत शनिवारी मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी शहराला गाळे नाही पाणी द्या, अशा जोरदार घोषणा दिल्या. बैठकी साठी आलेले प्रदेश कॉंग्रेसचे कार्यध्यक्ष मुजफ्फर हुसेन हे देखील या आंदोलनात सहभागी झाले.
एकीकडे शहराला पाणी पुरवठा योजनेची गरज असताना पालिका प्रशासनाने मात्र गाळे बांधण्याचा धडाका लावला हे खेदजनक असून आपण संबधित मंत्र्याकडे तक्रार तर करणार आहोतच शिवाय जर पालिका प्रशासनाने सर्व निधी पाण्यासाठी वापरला नाही तर कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुजफ्फर हुसेन दिला आहे
कॉंग्रेस भवनापासून शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून जावून हा मोर्चा एकात्मता चौकात आल्यानंतर येथे धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी अफजल शेख यांनी पालिका प्रशासनच्या कारभारावर जोरदार टीका करत म्हणाले की शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी शासनाने करंजवण योजना मंजूर केली मात्र पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे वर्गणी भरण्यासाठी अडचण येत आहे. शासनाने नुकतेच पालिका प्रशासनाला ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून गाळे बांधले जात आहे. सध्या शहराला गाळ्यांची नाही तर पाण्याची गरज आहे. त्यामुळे गाळ्यांचे काम न करता हा निधी करंजवण योजनेसाठी वापरण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष मुजफ्फर शेख हे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी मनमाडला आले होते ते देखील आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात कॉंग्रेसचे नेते डॉ.तुषार शेवाळे माजी नगराध्यक्ष रहेमान शहा, गट नेते रवींद्र घोडेस्वार, नगरसेवक मिलिंद उबाळे, नाजीम शेख, संजय निकम यांच्यासह सुनील गवांदे, शशिकांत व्यवहारे, भीमराव जेजुरे, इलियास पताहन, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.