मनमाड – मनमाड-मालेगाव रस्त्यावरील खड्डे अखेर जीवघेणे ठरले आहेत. रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी स्मशानभूमीजवळ झालेल्या अपघातात अनिल रंगनाथ मिसर (वय ३२, रा. विवेकानंद नगर) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा मालेगाव नाका येथून गावात जात होता. त्याचवेळी बसस्थानकाजवळील स्मशानभूमीजवळ तो आला. तेथे रस्त्याला मोठे खड्डे असल्याने अनिल हा खड्डा चुकवत होता. त्याचवेळी एका बाजूने गाईने अचानक रस्त्यावर उडी मारली. त्यामुळे अनिल हा गायीवर जाऊन धडकला. या अपघातात गाय रस्त्यावर खाली पडली तर अनिल हा मोटरसायकलसह रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनिलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी अशोक मिसर यांचा भाऊ असून तो खाजगी वाहनचालक होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खड्डे कधी बुजणार
शहरांतर्गत तसेच शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मनमाडकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. खड्डेमय रस्ते अजून किती जणांचे प्राण घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक करीत आहेत.
—
महामार्गासह शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सातत्याने अपघात होत असल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
– किशोर लहाने, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती