नाशिक:- कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रदुषणामुळे श्वसनाचे विकार टाळण्यासाठी यंदाची दिवाळी नाशिक महापालिका क्षेत्रात फटाकेविरहित दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे. या संदर्भात नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की गेल्या सात-आठ महिन्यांपासुन जगभरात कोविड संकटाने थैमान घातले असून लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. अद्याप हे संकट टळलेले नसून येत्या हिवाळ्यात दूसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साजरा करताना नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोविडमधुन बरे झालेल्या रुग्णांना तसेच नाशिककरांनाही या धुरामुळे श्वसनाचे आजार जडू नयेत तसेच नाशिकची प्रदूषण पातळी नियंत्रित राहावी यासाठी महानगरपालिकेनेच फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नाशिककरांना करावे.