नाशिक – कोरोना काळात नाशिक मध्यवर्ती कारागृहात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असल्याने आतापर्यंत कारागृहातील एकही बंदी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झालेला नाही ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
आज नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या नियमित तपासणीचे वेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. यावेळी गेल्या २०२० यावर्षात कारागृहातील साधारण १५ बंदीवानांना हृदयविकारा चा त्रास जाणवला असता बंदीवानांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने १४ बंदीवानाचे प्राण वाचले असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले असता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कारागृह प्रशासनाने केलेल्या कामाची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मध्यवर्ती कारागृहास प्रत्यक्ष भेट देऊन कोरोना संसर्गाबाबत करण्यात आलेल्या उपययोनांचा आढावा घेतला. तसेच मागील बैठकीत जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील स्वयंपाकगृह दुरुस्त करणे बाबत तसेच रस्त्यांची डागडुजी करणे बाबत व पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी RO unit बसवणे संदर्भात सूचना दिली होती या सर्व मुद्यांची कारागृह प्रशासनाने पूर्तता केली असल्याने जिल्हाधिकारी यांनी कारागृह प्रशासनाचे कौतुक केले.