भोपाळ – मध्य प्रदेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांबाबत गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने येत्या रविवारी राज्यातील आणखी पाच शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात विदिशा, उज्जैन, ग्वॉल्हेर, नरसिंगपूर आणि सोनसर या शहरांचा समावेश आहे. यापूर्वी राज्य सरकारने रविवारी इंदूर, भोपाळ, जबलपूर, बैतूल, छिंदवाडा, रतलाम आणि खरगोन येथे लॉकडाउन लागू केले आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २६५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी राज्यात नऊ जणांच्या मृत्यूने राज्यात संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ३,९३७ वर पोचली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रविवारी राज्यातील आणखी पाच शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या आठवड्यात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण ६.३ टक्के होते, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा ४.६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने त्रिस्तरीय रणनीती तयार केली आहे. यात संक्रमित लोकांची तपासणी करणे, संक्रमित व्यक्तीचे चांगले उपचार सुनिश्चित करणे आणि शक्य तितक्या लवकर संपूर्ण राज्यात लसीकरण करणे समाविष्ट आहे.