भोपाळ – महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर चर्चेत असताना मध्य प्रदेशात काही शहरांचे नामांतर लवकरच होणार आहे. मध्यप्रदेशातील काही शहरांची आणि स्थळांची नावे परकीय आक्रमणकर्त्यांच्या काळात बदलण्यात आली होती. आता सत्ताधारी भाजप सरकार पुन्हा या शहरांचे पुर्वीप्रमाणे नामांतर करणार आहे. यामध्ये राजधानी भोपाळसह अन्य शहरांचा समावेश आहे.
राज्य सरकारने शहरांच्या नामांतराच्या दिशेने काम सुरू केले आहे. या शहरांमध्ये नर्मदापुरम (होशंगाबाद) आणि भेरुंडा (नसराल्लागंज) यांचा समावेश असून येथून भारतीय संस्कृतीची ओळख पुन्हा स्थापित करण्यास सुरवात केली आहे.
भोपाळमधील मिंटो हॉल तसेच औबेदुल्लागंज, गौहरगंज, बेगमगंज, गररटगंज, बुरहानपूर, सुलतानपूर यासह एक डझन शहरे – ठिकाणे नामांतर करण्यास सज्ज आहेत. या शहरांचे रहिवासी आणि लोकप्रतिनिधी बर्याच काळापासून नावे बदलण्याची मागणी करत आहेत.
तीन महिन्यांपूर्वी विधानसभेचे विद्यमान सभापती असलेले रामेश्वर शर्मा यांनी भोपाळमधील ईदगाह टेकड्यांचे नाव बदलून गुरुनानक टेकरी असे नामकरण करण्याची मागणी केली.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी शिखांचे पहिले गुरु गुरु नानक या ठिकाणी राहिले असून येथे गुरूंच्या पायाचे ठसे आहेत. यापूर्वी भोपाळ नगर परिषदेने भोजपाल असे नाव देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित ठेवला आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचे विभाग, ठिकाण किंवा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.
स्थानिक संस्था हा प्रस्ताव सरकारकडे पाठवते आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला जातो. त्यांच्या मंजुरीनंतर गृह विभाग नाव बदलण्याची अधिसूचना जारी करतात.