नवी दिल्ली – मधुमेह म्हटले की खाण्यापिण्याच्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. अनेक निर्बंध येतात. पायी फिरण्याची सवय लावून घ्यावी लागते. मधुमेहींना चहा, कॉफीत साखर घेताना विचार करावा लागतो. पण तो अगोड चहा किंवा कॉफी घशाखाली उतरतेच असं नाही. यामुळेच मधुमेहींसाठी मध हा साखरेला पर्याय होऊ शकतो का, असा प्रश्न समोर आला. ढोबळमानाने याचं उत्तर हो असलं तरी यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे.
मधुमेहाच्या रुग्णांना कार्बोहायड्रेट आणि साखर खाण्यावर कंट्रोल करावा लागतो. पण याचा अर्थ त्यांनी गोडापासून पूर्णपणे लांब रहावे असे नाही. मध देखील पूर्णपणे लाभकारक आहे, असे नाही. पण यात अँटी इन्फ्लामेंटरी गुण आहेत, जे साखरेच्या त्रासापासून वाचवतात.
पण साखर आणि मधाची तुलना केली तर मध केव्हाही उजवा ठरतो. कारण, साखरेत व्हिटॅमिन्स किंवा खनिजे नसतात. त्यामुळे तुम्ही मध खायचा ठरवलात तर त्याचा फायदा एकच, तो म्हणजे रक्तातील साखर वाढण्याचा वेग काही प्रमाणात का होईना कमी होतो.
मध तसेच साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो, हे पाहण्यासाठी २००४ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आला. मधूमेह झालेल्यांनी मध खाल्ला तर मध खाल्ल्यापासून अर्ध्या तासाने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले. त्यानंतर हे प्रमाण कमी होऊन दोन तास हे प्रमाण कमीच राहिले.
संशोधकांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले इन्सुलिन वाढवण्याचे काम मधामुळे होते. मध वापरल्यास इन्शुलिनच्या पातळीत वाढ होऊ शकते. मात्र, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचणे ही घाई ठरेल.