नाशिक : जिल्ह्यातील मद्य तस्करीत अहमनगर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याचा संबध असल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्कला आहे. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. लिकर किंग अतुल मदन यांच्याकडील जप्त केलेल्या मद्य प्रकरणाचा तपास करतांना ही माहिती पुढे आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. याअगोदर केलेल्या कारवाईत जप्त केलेला मद्यसाठा आणि संबंधित कारखान्यातल्या मद्याचे नमुन्यांमध्ये साधर्म्य आहे का याबाबत तपास केला जाणार आहे. हा कारखाना मोठ्या राजकीय व्यक्तीशी संबधीत असल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
२० नोव्हेंबर रोजी नाशिक ग्रामीण पोलिसांनी महामार्ग टेहरे फाटा येथे कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला होता. या कारवाईत मालट्रकसह दारूसाठा जप्त केला होता. विशेष म्हणजे पशू खाद्याच्या आडून दारूची तस्करी केली जात असल्याचे या प्रकरणात पुढे आले होते. त्यानंतर एक्साईज विभागाने लिकर किंग म्हणून ओळखल्या जाणा-या अतुल मदन याची नाशिक शहरात २६ दुकाने दुकानांची तपासणी केली. त्यातील अनियमीततेमुळे १४ दारू दुकाने सील केली. या कारवाईत दोन दुकानांमध्ये ५० लाख रूपये किमतीचे १२०० बॉक्स बनावट मद्याने भरलेली आढळली. हेच बनावट हस्तगत केलेले मद्य हे अहमदनगर जिह्यातील कारखान्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास सुरु आहे.
फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले सॅम्पल
अतुल मदन याच्याशी संबंधित असलेल्या दुकानातून एक्साईजने मद्याचे बॉक्स, लेबल, स्पिरीट, मद्य, बूच याचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले असून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. पोलीसांच्या हाती देशी व विदेशी मद्यसाठा लागला असला तरी एक्साईजच्या छाप्यात देशी मद्य आढळून आले आहे. ही दारू कोणत्या कारखान्यातून आली. या दिशेने आता हा तपास सुरु झाला आहे.