नाशिक –राज्यामधील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगामार्फत घोषित करण्यात आला असून त्याकरीता १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याअनुषंगाने नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना अशा ठिकाणी काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी भरपगारी विशेष रजा देण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिल्या आहेत, असे नाशिक विभागाचे कामगार उप आयुक्त गुलाब दाभाडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धपत्रकात नमुद केल्यानुसार, राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता ग्रामंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी नागरी क्षेत्राच्या विशेषत: महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रा लगतच्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राहणारे बहुतांश मतदार हे कामा निमित्त नागरी क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमधील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा मतदानाला जाण्यासाठी विशेष सवलत देण्यात यावी, जेणे करून मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. तसेच शहरी भागात अथवा निवडणुका नसलेल्या ग्रामीण भागातील दुकाने, कंपन्या व वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही, असे देखील शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार कळविण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अधिक प्रमाणात मतदान होण्यासाठी वर नमुद करण्यात आलेल्या आस्थापनांच्या मालकांनी त्यांच्या आस्थापनेवरील कामगारांना १५ जानेवारी २०२१ रोजी भरपगारी सुट्टीसह विशेष रजा देण्यात यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त दाभाडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.