केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई ः केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा खात्याने महाराष्ट्र राज्यातील मका खरेदीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे मका उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसंच राज्य सरकारला अतिरिक्त २५ हजार मेट्रिक टन पर्यंत मका खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या पत्रकात म्हंटले आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे आणि राज्यात अधिक खरेदी झाली पाहिजे, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जून महिन्या मध्ये मका खरेदीची मर्यादाही वाढवून ती ९० हजार मेट्रिक टन करण्यात आली. तसेच खरेदीची मुदत सुद्धा वाढवली होती, त्यानुसार १५ जुलै पर्यंत ९० हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात आला. मात्र अजूनही ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असल्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारने मदतवाढ करत ३१ जुलै पर्यंत अतिरिक्त २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्याची परवानगी राज्य सरकारला दिली आहे.
मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत चणा आणि मका खरेदीसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भावात आपल्या मक्याची विक्री करता येणार आहे असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या पत्रकात म्हंटले आहे.