मकर संक्रांतीचे महात्म्य
भारत हा कृषीप्रधान देश असल्याने आपले सर्वच सण हे पूर्वापार कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. पेरणी, काढणी, सुगीचा हंगाम यावर सर्व सणांची रचना केलेली आढळते. जानेवारी महिन्यातला पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत शब्द संक्रमण या शब्दावरून आलेला आहे.
पौराणिक कथा
सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश म्हणजेच संक्रमण होय. मकर राशीचा स्वामी शनी आहे. जो रवी पुत्र आहे. म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी रवी हा आपला पुत्र शनी यांचे घरी त्यास भेटायला जातो. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत होय. त्याचप्रमाणे उत्तरायण प्रारंभ हा देखील मकर संक्रांती प्रसंगी होतो. उत्तरायण काळात स्वर्गाचे दार उघडलेले असते, अशी पौराणिक मान्यता आहे. कौरव-पांडव युद्धाच्यावेळी पितामह भीष्म हे अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन शरशय्येवर पडलेले असताना देखील त्यांनी आपला प्राण उत्तरायणाच्या प्रारंभी सोडला. इतका हा पुण्यकाळ आहे, अशी पौराणिक कथा आहे.
पुण्य काळ
१४ जानेवारी रोजी असणाऱ्या संक्रांतीचा पुण्य पर्व काळ हा सकाळी ८.१५ पासून दुपारी ४.१५ पर्यंत आहे. संक्रांत हा सुगीच्या काळाशी निगडीत सण असल्याने संक्रांतीच्या एक दिवस आगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतभरात विविध नावाने हा सण साजरा केला जातो. भोगी या दिवशी सुगडी अर्थात मातीचे छोटे मडके खरेदी केली जाते. त्यामध्ये ओले हिरवे हरभरे, बोरे, ऊस, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ, हलवा या वस्तू भरल्या जातात. त्याचा ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवला जातो.
हळदी-कुंकू समारंभ
सूर्य पूजनाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. या सर्व पदार्थांनी भरलेल्या सुगड्यांचे वाण महिलावर्ग हळदी-कुंकू समारंभ करून एकमेकांना देत असतात. या हळदीकुंकू समारंभात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचे वाण देण्याची पूर्वापार प्रथा आहे. हे हळदीकुंकू समारंभ पुढे रथसप्तमीपर्यंत सुरू असतात. यंदा हा काळ १९ फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यादिवशी रथसप्तमी आहे.
भोगीचा दिवस
संक्रांतीच्या एक दिवस आगोदर भोगीच्या दिवशी वालाच्या शेंगा म्हणजेच घेवडा पावटा, वांगी, जवस, हरभरा, गाजर, वटाणा घालून भाजी करतात. त्यासोबतच मुगाची डाळ व तांदूळ यांची तीळ घालून खिचडी केली जाते. भाकरी मध्येदेखील तीळ घातले जातात. याचा नैवेद्य दाखवला जातो. तीळ व गूळ यामध्ये उष्ण घटक असल्याने थंडीच्या मोसमामध्ये त्याच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. मुख्य संक्रांतीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला पुण्य पूर्व काळामध्ये नदी स्नान, सूर्याला अर्घ्य देणे, दानधर्म, कुलदेवता पूजन, देवदर्शन या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. घरात आंघोळीच्या पाण्यात देखील तीळ टाकून त्याने स्नान केले जाते.
यंदाचे वैशिष्ट्य
यंदाच्या संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीने पांढरे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातामध्ये भृसुंडी नावाचे शस्त्र आहे. तिने कस्तुरीचा टिळा लावला आहे. तिचे स्वरूप बालक आहे. ती देव संक्रांत आहे. तिने प्रवाळ हे आभूषण धारण केले आहे. तिचे वार नाव नंदा आहे तर नक्षत्र नाव महोदरी आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे तर आग्नेयेकडे बघत आहे. तिथे मुख्य वाहन सिंह आहे तर उपवाहन हत्ती आहे. तिचा समुदाय मुहूर्त तीस आहे. तिने हातामध्ये चाफ्याचे फुल घेतले आहे. ती अन्न भक्षण करीत आ,हे असे यावेळच्या संक्रांतीचे वैशिष्ट आहे.
हे करु नये
संक्रांतीच्या पुण्य पर्व काळामध्ये दात घासू नये, कोणत्याही वस्तूला धार करू नये, वाद घालू नये, वैरभाव ठेवू नये, असा शास्त्रार्थ आहे. याप्रसंगी पुण्य पर्व काळामध्ये तिळाचे पात्र, तांब्याची भांडी, वस्त्रदान, अन्नदान याला विशेष महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक सणाच्या वेळी त्या मोसमातील वातावरणा प्रमाणे वस्तूचे सेवन करण्याचा प्रघात असल्याने संक्रांतीच्या वेळी थंडीच्या मोसमात उष्ण अशा तीळ व गुळाचे सेवन करावे. एकमेकांना तिळगुळ घ्या आणि वर्षभर गोड बोला असे वर्षाच्या सुरुवाती पासूनच एकमेकां प्रती स्नेह व आदर भाव निर्माण करणाऱ्या या संक्रांत सणाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!