नाशिक – मंदिरे उघडण्यास सरकारने परवानगी द्यावी. अन्यथा २८ ऑगस्ट रोजी कपालेश्वर मंदिराजवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पुरोहित संघ व मंदिरांच्या व्यवस्थापनातील पदाधिका-यांनी घेतला आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) या विषयावर बैठक संपन्न झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या मंदिरे बंद आहेत. लॉकडाऊन हळूहळू उठवून अनेक बाबींना परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आता मंदिरेही उघडावीत, यासंदर्भात संघ व पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला पुरोहिंत संघाचे सतीश शुक्ल, अॅड. अविनाश गाडे, अनिल भगवान, प्रभावती जगताप, साहेबराव गाडे, कपालेश्वर मंदिराचे अतुल शेवाळे, काळाराम मंदिराचे धनजंय पुजारी, सुधीर पुजारी, हिंदू एकताचे रामसिंग बावरी, विश्व हिंदू परिषदेचे विनोद थोरात, प्रशांत दीक्षित, महंत भक्तीचरणदास हे उपस्थित होते. दोन दिवसापूर्वीच त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता नाशिकमध्ये सुध्दा आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला आहे.