नवी दिल्ली – ‘जेव्हा संपूर्ण जगाचे काम थांबले होते, तेव्हा भारतीय रेल्वे कर्मचार्यांनी एक दिवसाचीही सुटी न घेता आपला जीव धोक्यात घालून काम केले. त्याचा परिणाम असा आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र चालू राहू शकले. देशातील विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा होऊ शकला.’ कोरोना कालावधीत देशभरातील रेल्वे कर्मचार्यांनी दाखविलेल्या अत्यंत कर्तव्य निष्ठतेबद्दल कौतुक करीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना असे भावनिक पत्र लिहिले आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या पत्राद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यात प्रत्येकाची भूमिका त्यांनी महत्त्वाची मानली. वर्षभराच्या कठीण प्रवासात कोविड -१९ मधील आपत्तीत काही रेल्वे कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांच्या प्रियजनांना गमावल्याबद्दल दुःख व्यक्त करताना गोयल म्हणाले की, आम्ही त्यांना विसरू शकत नाही. यावेळी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संयम, समर्पण व निर्धारामुळे रेल्वेने या साथीवर विजय मिळवून देशाला अभिमान वाटला आहे. कठीण परिस्थितीत संयम आणि धैर्य दाखविणाऱ्या रेल्वे परिवारास मी सलाम करतो.
मागील वर्षी आणि यावर्षी देखील कोरोनाच्या काळात देशातील जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा, वीजगृहांमध्ये कोळसा, शेतकऱ्यासाठी खते किंवा ग्राहकांना देशाच्या दुर्गम भागात अन्नधान्य पुरवण्यासाठी रेल्वेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच विविध ठिकाणी अडकलेल्या ६३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या घरी नेण्यासाठी रेल्वेची मदत झाली.
कोविडविरूद्ध झालेल्या सामूहिक लढाईत रेल्वेने दिलेल्या योगदानास देश नेहमीच लक्षात ठेवेल. तुमच्या तीव्र इच्छाशक्तीमुळेच आम्ही या संकटांना संधीमध्ये बदलू शकलो. लॉकडाऊनच्या वेळी अनेक निर्बंध असूनही, सुरक्षा आणि मूलभूत सुविधेशी संबंधित अनेक मोठी कामे पूर्ण झाली. देशात प्रथमच ‘किसान रेल’ सेवा आमच्या प्रदात्यांना मोठ्या बाजारात जोडण्यासाठी दुवा बनली. केवळ रेल्वे कर्मचार्यांच्या सेवेमुळेच हे शक्य झाले आणि भारतीय लोकांच्या मनाला ते स्पर्शून गेले.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1378194963612147717