मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ट्विट करुन खळबळ माजविली खरी पण आता ते ट्विट त्यांनी डिलीट केले आहे. त्यामुळे राज्यात तर्कवितर्क लढविले जात आहेत. तसेच, राज्यातीलकॅबिनेट मंत्रीच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आव्हाड हे बेधडक आणि आक्रमक बोलण्यात अत्यंत ख्यात आहेत. मात्र, त्यांनी मध्यरात्री एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा फोन टॅप होत आहे. कोणत्या तरी एजन्सीकडून त्यांच्या वहॉटसअॅपवर पाळत ठेवली जात आहे. मंत्रीच असे ट्विट करीत असल्याने यासंदर्भात अनेकांच्या भुवया उंचावल्या. सत्ताधारी गटातील वरिष्ठ नेता आणि मंत्र्याचेच फोन टॅपिंग होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, आव्हाड यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ते ट्विट आता गायब झाले आहे. त्यांनीच ते स्वतः डिलीट केले की ट्विटरने डिलीट केले याबाबत शंका-कुशंका निर्माण होत आहेत.