नाशिक – कोविड-१९ मुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू शिथील होत असले तरी राज्यातील मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संलग्न व्यवसाय मात्र आजही लॉकडाऊन कचाट्यात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (दि. २) धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष केशव डिंगोरे यांनी दिली.
आपल्या मागण्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी असोसिएशनने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ९ वाजता गोल्फ क्लब मैदानानजिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह या संघटनेशी संलग्न असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट, एलईडी वॉल, डीजे साऊंड, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स, छायाचित्रकार, केटरर्स, घोडाबग्गी, ऑर्केस्ट्रा, बॅण्डवादक, स्वागत ग्रुप, वेटर, फेटेवाले, जनरेटर आदी व्यावसायिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक संघटनांचे सदस्य व्यवसायाअभावी आर्थिक विपन्नावस्थेत गेले असून त्यांना केवळ बिगीन अगेन मोहिमेअंतर्गत पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे श्री डिंगोरे यांनी सांगितले.
सदर आंदोलनात मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संलग्न व्यावसायिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री डिंगोरे यांच्यासह असोसिएशनचे सल्लागार विनोद दर्यानी उपाध्यक्ष दाऊद काद्री, सचिव सुनील महाले, जितेंद्र शर्मा, शिवा देवरे, उमेश गायकवाड, अमर वझरे,संजय शिंदे, पुनाराम महाराज, सुभाष नाईकवाडे, पंकज वाणी, अनिल अमृतकर आणि विभागीय पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पांढरा शर्ट घालून काळी छत्री आणण्याचे आवाहन
दरम्यान सोमवारी करण्यात येणारे धरणे आंदोलन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात येणार असल्याचे पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. सहभागी होणार्या आंदोलकांनी पांढरा शर्ट घालून यावा, तसेच सोबत काळ्या रंगाची छत्री आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.