दूर व मुक्त शिक्षण
कोरोना संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. पण, यापुढील काळात दूर व मुक्त शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक वाढणार आहे, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह इग्नू आणि अन्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही अधिक होणार आहे.
- संतोष साबळे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
वर्गात नसणाऱ्या आणि भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्यांना त्यांच्या गरजांनुसार दिले जाणारे शिक्षण म्हणजे दूरशिक्षण, अशी साधी व सरळ व्याख्या आहे. तेच सध्या घराघरात सुरू आहे. आजकाल अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच शिक्षण ही सुध्दा मानवाची मूलभूत गरज बनली आहे. एकंदरीच वैयक्तिक विकासाबरोबर देशाच्या सर्वांगीण विकासासाठीही समाज शिक्षित असणे गरजेचे असते. त्यामुळे शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. सध्याचा जमाना मल्टिस्किलचा आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला वेगवेगळी शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी त्यांच्या जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. पारंपरिक महाविद्यालयांत प्रत्यक्षात जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही अशांना मुक्त शिक्षण पद्धतीच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षणाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम हे विद्यापीठ नेटाने करीत आहे. म्हणूनच बदलत्या महाराष्ट्रात मुक्त शिक्षणाचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे योगदान महत्त्वपूर्ण बनले आहे. कोरोनामुळे ते दिवसागणिक वाढणार आहे.
ज भारतात ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ’ या राष्ट्रीय विद्यापीठासह अनेक राज्यांमध्ये राज्य पातळीवरची मुक्त विद्यापीठे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. मुक्त विद्यापीठांबरोबरच अनेक पारंपारिक विद्यापीठांमध्येदेखील दूरस्थ शिक्षण विभागदेखील यासाठी कार्यरत आहेत. या विद्यापीठानं सुरुवातीपासूनच प्रयोगशीलता जोपासली आहे. नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच गरजांवर आधारित तसेच भविष्यवेधी अशा शिक्षणक्रमांची सुरुवात झाली आहे. अनेकांना या विद्यापीठांचे अभ्यासक्रम हे आपलेसे वाटत आहेत.
पारंपरिक शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिक्षण प्रवाहात सामील करून घेण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आणि पदवीधर होऊन आत्मसन्मान उंचावण्याची एक महत्त्वपूर्ण सुविधा दूरशिक्षण प्रणालीवर आधारित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्रातील लाखो इच्छुक शिक्षणार्थ्यांना करून दिली, हे एक मोठे सामाजिक योगदान आहे. कोरोना संकटामुळे आता दूरस्थ शिक्षणाकडेच अनेकांचा कल राहणार आहे.
कौशल्याधारित शिक्षणक्रमांसाठी खाजगी संस्था, छोटे मोठे उद्योग याचबरोबर वेळप्रसंगी व्यक्तीवरदेखील सोपवलेली अभ्यासकेंद्राची जबाबदारी, मूल्यमापनासाठी गुणांऐवजी श्रेणीपद्धतीचा वापर, बी.ए. सारखी पदवी देत असतानाही उपयोजित अभ्यासक्रमांवर दिलेला भर तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यातील काही अभ्यासक्रमांऐवजी संगणक कौशल्याचे अभ्यासक्रम करण्याची उपलब्ध करून दिलेली संधी असे अनेक प्रयोग विद्यापीठाने सुरुवातीच्या काळात केले. तेच खरे बीजारोपण होते.
अनेकदा काळाच्या पुढचा विचार असल्याने समाजातून तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळा समाजाने प्रचलित पद्धतीचाच आग्रह धरला. त्यामुळे अनेक वेळा विद्यापीठ करत आहे ते योग्य आहे हे माहित असूनही माघार घ्यावी लागली. इतर सर्व विद्यापीठांप्रमाणेच गुण देण्यात यावेत या विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे विद्यापीठाला श्रेणी पद्धत सोडून गुणपद्धती स्विकारावी लागली. आज आता विद्यापीठ अनुदान आयोगचं सर्व विद्यापीठांना श्रेणी पद्धत सुरू करायला सांगत आहे. कुशल मनुष्यबळाची गरज आहे हे ओळखून या विद्यापीठाने २० वर्षांपूर्वीच सुरू केलेले कौशल्याधारित शिक्षणक्रम त्यावेळी मागणी नसल्याने बंद करावे लागले होते. आज आता केंद्र शासनाकडून कौशल्य शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळेच कौशल्याधारीत शिक्षणाचे वारे आता चौखूर वाहू लागले आहेत.
पाहिजे त्याला, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेथे हवे ते शिक्षण देण्याची सुविधा मुक्त विद्यापीठाने निर्माण करून दिली आहे. समाजातील वंचित घटकांना विविध कारणांमुळे आपले पदवी शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवट राहिल्याने, त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची संधी देण्यासाठी मुक्त विद्यापीठाने अनेक शिक्षणक्रम सुरू केले आहेत. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या विद्यापीठात नोकरी, व्यवसाय, संसार सांभाळून काम करता-करता शिक्षण देतानाच ज्ञानाची कवाडे समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे विद्यापीठ गेल्या ३१ वर्षांपासून यशस्वीपणे करीत आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील शंभराहून अधिक निरनिराळ्या शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी अशा विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांचा समावेश आहे. त्यातील अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष करून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या गरजा ओळखून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे या विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण प्रवेशप्रक्रियाच ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून, शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर या विद्यापीठाने भर दिला आहे. हे नवीन बदल राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी आत्मसात केले हे विशेष.
शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाज घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुयोग्य असे शैक्षणिक तंत्रज्ञान केवळ मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नव्हे तर, अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा, अध्ययन पद्धतीत वापर करून टिकाऊ स्वरूपाचे शिक्षण देऊन शैक्षणिक क्रांती केली. याचमुळे ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या जागतिक संघटनेने ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या विद्यापीठाला एकदा नव्हे तर दोनदा दिला. या विद्यापीठातून पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून २०१० पासून एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान व उत्तम कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी असून त्यांनी केवळ स्वयं-अध्ययनावर भर देऊन मुक्त आणि दूरशिक्षण पद्धतीचे प्रभावीपण सिद्ध केले आहे.
कोरोनाचे संकट हे केवळ भारतात नाही तर जगभर आहे. या संकटाने मानवी जीवनशैली बदलणार आहे. किंबहुना बदलत आहे. याच काळात शिक्षणाचा नवा अध्यायही सुरू होतो आहे. दूरस्थ आणि मुक्त शिक्षणाची गंगा आता सर्वत्र वाहणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे केले जाणारे आवाहन घरात बसूनच शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त करीत आहे. त्यामुळे यापुढील काळात मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. तसेच, नवनवीन अभ्यासक्रमांची मूहूर्तमेढही रोवली जाणार आहे. त्याचा लाभ इच्छुकांनी घेतला तरच ज्ञानगंगा खळाळती राहिल.