बीजमातेनं पेरलेला अंकुर
कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्यानिमित्ताने पद्मश्री राहीबाई पोपेरे मुक्त विद्यापीठाच्या परिसरात आल्या. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा प्रत्यय त्यांच्या या भेटीनं दिला. तसेच, त्यांनी त्यांच्या कार्य आणि विचारांच्या अंकुराचं रोपणही याच भेटीत केलं. आजही तो समारंभ लख्ख डोळ्यासमोर तरळत असतो.
- संतोष साबळे
(लेखक माध्यमतज्ज्ञ आहेत)
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या माथ्यावर अनेक विस्तीर्ण पठारं पसरली आहेत. त्यापैकी एका पठारावर, दुर्गम भागात वसलेलं कोंभाळणे हे अहमदनगर जिल्ह्यातला अकोले तालुक्यातील लहानसं आदिवासी खेडं. खडकाळ माळावर उभ्या असलेल्या या दुर्लक्षित गावाकडं जगाचं लक्ष वेधलं गेलं ते राहीबाई पोपेरे यांच्या बियाणे बँकेमुळं! बीजमाता म्हणून त्या देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखल्या जाताहेत. अनेक, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना मिळालेत. मात्र, अशावेळी स्तुतीची हवा डोक्यात न जावू देता, जमिनीवर राहून काम करणाऱ्या आणि आपल्या साध्या राहणीमानातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई यांच्याशी झालेल्या भेटीचा एक प्रसंग खुपच अनमोल आहे.
बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री सन्मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच मिळाला. आदिवासी समाजातली लाजरीबुजरी, सामान्य शेतकरी महिला ते ‘बीजमाता पद्मश्री राहीबाई’ असा अथक मेहनतीचा आणि जिद्दीचा प्रवास अत्यंत वेधक आणि रोचक आहे. एवढेच नव्हे तर बीबीसीच्या जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या राहीबाईंनी विश्वाला कवेत घेतले तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत, हे विशेष. ज्या काळ्या मातीशी नाळ जोडली गेलीय, तिच्याशी इमान राखत साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी काय असते हे त्यांचाशी संवाद साधल्यानंतरच समजतं.
निमित्त होतं, त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या निमंत्रित केल्या प्रसंगाचं…..
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरु झाली. २० डिसेंबर २०१९ तारीख ठरली. पण उदघाटनाला कोणाला बोलवायचं यावर शोध सुरु झाला. तेव्हा मी कृषी विज्ञान केंद्रात कृषी पत्रकारिता या पदविका शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करायचो. त्यामुळे या केंद्रात बरेचदा येणे जाणे व्हायचे. कृषी तंत्रज्ञान महोत्सव तयारी सुरू असताना या केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या दालनात बैठक सुरू होती, अशातच माझा तिथे प्रवेश झाला, नेहमीप्रमाणे सहज विचारलं सर काय नवीन! त्यावर पाटील सरांनी या महोत्सवाच्या योजनाबद्दलची माहिती दिली आणि कुणी चांगला वक्ता असेल तर सुचवा म्हणून सांगितलं. या कार्यक्रमासाठी आदिवासी भागातील शेतकरी येणार असे त्यांनी सांगताच माझ्या डोळ्यासमोर एकच नाव आलं आणि ते म्हणजे राही मावशी अर्थात बीजमाता म्हणून ज्यांनी सबंध देशात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला अशा राहीबाई पोपेरे यांचं.
रावसाहेब पाटील यांच्या दालनात बसलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना राहीबाईंच्या कामाची माहिती देताच सर्वांनी क्षणार्धात त्याला होकार दिला आणि राहीबाई यांनाच या महोत्सवाचं उदघाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचं ठरलं. विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून बाएफचे अधिकारी जितीन साठे यांच्याशी संवाद साधला आणि राहीबाईंना या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचं सांगितलं गेलं. आपल्या तालुक्यातील एक व्यक्ती या विद्यापीठात अधिकारी आहे आणि या विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्य हे हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगताच राहीबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी होकार दिला. अर्थात तेव्हा आमची प्रत्यक्षात भेटही झालेली नव्हती. परंतु आपल्या तालुक्यातील एक व्यक्ती एवढ्या मोठ्या विद्यापीठात आहे, याचा त्यांना आनंद होता.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साठे साहेबांशी बोललो. त्यांचा तिथून निघून निर्णयापासून तर विद्यापीठात पोहोचेपर्यंत प्रवास चहा-नाश्ता जेवणाबद्दल विचारपूस विचारताच राहीबाई म्हणाल्या, मी बाहेर काही खात नाही. कुठलाही नाष्टा करत नाही, मी फक्त चहा घेऊन घरातून निघेल. उपवास असल्याने जेवणार नाही. कुठलाही बडेजाव न ठेवता, एक आई जसं आपल्या मुलाला सांगते तशाच, राही मावशी मला सांगत होत्या.
अखेर २० डिसेंबर हा दिवस उजाडला. साठे सर राहीबाईंना घेऊन विद्यापीठाच्या आवारात आले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्यांचं स्वागत केलं. त्यांना घेऊन कृषी विज्ञान केंद्राच्या बाहेर गाडी पार्क केली. मी आणि राहीबाई कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहाकडे चालू लागलो. रस्त्यातच रोडगे मॅडम भेटल्या. म्हणाल्या, ‘आपले प्रमुख पाहुणे कधी येणार आहेत सर’ रोडगे मॅडमचे बोलणे ऐकताच आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. स्मित हास्य करत मावशी चला असं सांगत, पुढे निघालो. तेवढ्यात बाहेरच नोंदणी विभाग होता. येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी तेथे सुरू होती. नोंदणी करणारा विद्यार्थी उदगारला, ‘मावशी…. तुमचे नाव सांगा आणि इथे सही करा.’ रोडगे मॅडम सुद्धा तिथेच होत्या. अखेर मला राहवेना, मग मी त्यांना सांगितलं की, आजच्या प्रमुख पाहुण्या राहीबाई याच त्या आहेत. हे सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांनी राहीबाईंना नमस्कार केला.
आम्ही रावसाहेब पाटील यांच्या दालनात पोहोचलो. काही वेळातच कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन सर आले. कार्यक्रम सुरु झाला. राहीबाई पोपेरे यांचे भाषण ऐकून कुलगुरूही भारावले. अन् त्यांनी राहीबाई यांच्या कार्याचे कौतुक केले. आदिवासी, डोंगराळ, अतिदुर्गम भागात राहणारी एक साधारण महिला कृषी क्षेत्रात एवढी मोठी क्रांती करू शकते याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
साधारण नव्वदच्या दशकानंतर जागतिकीकरणाचा वरवंटा फिरला आणि ग्रामीण संस्कृतीचा चेहरा झपाट्यानं बदलत गेला. जीवनशैली बदलली. या काळात अनेक गोष्टी नष्ट झाल्या. अशात राहीबाई नेटाने उभ्या राहिल्या आणि त्यांनी पारंपरिक वाणांचे जतन करण्याचा मंत्र दिला. कृषी क्षेत्रामध्ये पारंपरिक वाणांचं संगोपन, जतन करून शेतकऱ्यांना विषमुक्त शेती, सेंद्रीय शेती करण्याचा पर्याय किती उपयुक्त आहे हे सिद्ध केलं. राहीबाईंनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशामध्ये केलेलं कार्य महान असले तरीही आपले पाय जमिनीवर ठेवले. आपल्या समाजाच्या चालीरीती जपत माणुसकीचं नातं तुटू दिलं नाही. राहीबाईंच्या बियाणे बँकेत सध्या ५३ पिकांचे ११४ वाणं आहेत. असो. राहीबाई यांच्या या अनुभवातून नव्या पिढीने निश्चितच शिकण्यासारखे आहे, हे मात्र नक्की….!
अन झाले फोटो शूट
विद्यापीठात राहीबाईंचा कार्यक्रम सुरू असतानाच माझे मित्र भाऊसाहेब चासकर यांचा फोन खणखणला. म्हणाला संतोष आत्ताच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचा फोन होता. माझा कट्टा या कार्यक्रमात राहीबाईंना तीन-चार दिवसात निमंत्रित करत आहेत. पण त्यांच्याकडे राहीबाईंचे चांगला दर्जाचे फोटो नाही. तुझ्याकडे फोटोग्राफर असेल तर काही चांगले फोटो काढून पाठवल्यास बरे होईल. भाऊसाहेब चासकर यांचा फोन ठेवला आणि दहा मिनिटांतच कार्यक्रम संपला. लागलीच माझे सहकारी राजेश बर्वे यांना याबाबतची माहिती दिली. राही मावशींचे विद्यापीठाच्या आवारातच फोटो शूट केले गेले. राहीबाईंना निरोप दिल्यानंतर मित्र भाऊसाहेब चासकर यांना हे फोटो पाठवले. पुढे माझा कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमात ती छायाचित्रे प्रसिद्ध झाली.
(लेखकाशी संपर्क. मो. ९४०३७७४६९४. ई मेल- ssable1612@gmail.com )