ज्ञानगंगा घरोघरी
“ज्ञानगंगा घरोघरी” हे ब्रीद असलेल्या नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने समाजातील विविध घटकांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. नोकरी, व्यवसाय, घर संसार सांभाळून शिक्षण घेवू इच्छिणाऱ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील असंख्य पर्याय या विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेत. त्यात विशेषतः कौशल्याधारित शिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे.
- संतोष शिवाजी साबळे
(लेखक हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अधिकारी आहेत. तसेच लेखक आणि पत्रकार म्हणूनही ते ख्यात आहेत.)
निरनिराळी शैक्षणिक कौशल्य एकाच वेळी आत्मसात करण्याची किमया मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करता येते. वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना आवडीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे प्रवेश घेऊन शिक्षणाचे अर्धवट राहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येते. तसेच नोकरी-व्यवसाय सांभाळून शिक्षणाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच ज्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पात्रता नव्हती त्यांना शिकण्याची नवी संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे मिळाली आहे. काम करता-करता शिक्षण हा दूरस्थ शिक्षण पद्धतीतला सर्वांत उत्तम पर्याय या विद्यापीठामुळे मिळाला आहे.
1982 मध्ये आंध्रप्रदेशात पहिले मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. त्यानंतर 1985 मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ’ नवी दिल्लीत, 1987 मध्ये राजस्थान व बिहार राज्यात, तर 1989 मध्ये महाराष्ट्रात. अशी पाच मुक्त विद्यापीठे भारतात स्थापन करण्यात आली. राज्यस्तरावर असलेल्या मुक्त विद्यापीठांपैकी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशातले राज्य स्तरावरील चौथे मुक्त विद्यापीठ आहे. आज सर्वच क्षेत्रांत प्रगती साधून अद्ययावत बदल करून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाने आपले अनोखे स्थान प्राप्त केले आहे. अभ्यासकेंद्रे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा, मूल्यमापन, गुणवत्ता, इ-लर्निंगची उपलब्धता, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, व्यवहारातील पारदर्शकता, समाजातील विशेष वंचित घटकांसाठी विशेष शिक्षणक्रम आणि शिक्षण प्रक्रियेला साहाय्यभूत अशी कार्यक्षम व्यवस्था उभारली आहे. स्थापना वर्षी 3757 विद्यार्थी 15 अभ्यासकेंद्रात नोंदविले गेलेत. गत वर्षात 6 लाख 84 हजार 626 विद्यार्थी, 1600 हून अधिक अभ्यासकेंद्रे आणि दीडशेहून अधिक शिक्षणक्रम अशी मोठी वाढ विद्यापीठाने केली, ही बाब विद्यापीठासाठी गौरवशाली आहे.
विद्यापीठ स्थापनेच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यापीठाची वाटचाल होईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र गेल्या 30 वर्षांत विद्यार्थी संख्येचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मुक्त विद्यापीठाने अल्प कालावधीत आपला ठसा जनमानसावर उमटविला आहे. कारण या विद्यापीठाची काही वैशिष्टे आहेत. काम करता-करता शिक्षण, शिक्षणापासून वंचितांना पुन्हा नव्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, प्रमाणपत्रापासून संशोधनापर्यंत शिक्षण उपलब्ध, बारावी पर्यंत शिक्षण न घेऊ शकणा-या विद्यार्थांनाही पूर्व परीक्षा देऊन पदवी आणि त्यापुढे संशोधानापर्यंत शिक्षण घेण्याची संधी, अध्ययनासाठी बहुमाध्यमांचा वापर, आवडी व सवडीनुसार स्वतःच्या गतीने शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधी, प्रमाणपत्र / पदवी / संशोधन पदव्या इतर विद्यापीठांशी समकक्ष, अद्ययावत मुल्यमापन पद्धतीद्वारे परीक्षा आयोजन, आकाशवाणी, दूरदर्शन , दृक – श्राव्य चित्रफितीद्वारे घरबसल्या मार्गदर्शन, शिक्षणत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, अध्ययनाच्या संदर्भात लवचिक धोरण, पारंपरिक महाविद्यालयात शिकत असताना मुक्त विद्यापीठातील शिक्षणक्रम शिकण्याची संधी या विद्यापीठाने निर्माण करून दिली आहे.
या विद्यापीठाच्या या गौरवशाली वाटचालीत कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या नंतर आलेले डॉ. उत्तमराव भोईटे, प्राचार्य अशोक प्रधान, डॉ. बी. पी. साबळे, डॉ. राजन वेळूकर, डॉ. आर. कृष्णकुमार, डॉ. अरुण जामकर, प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे आणि विद्यमान कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाने नवनवीन कल्पना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणल्या. सर्व कुलगुरूंच्या मार्गदर्शनाने विद्यापीठातील अधिकार मंडळाचे सदस्य, संचालक, कुलसचिव, अधिकारी व सहकारी यांच्या प्रबळ इच्छाशक्ती व कर्तव्यनिष्ठेमुळे विद्यापीठाची घौडदौड वेगाने होत आहे. विभागीय केंद्रस्तरावरील संचालक, अभ्यासकेंद्रातील केंद्रप्रमुख, केंद्रसंयोजक, संमंत्रक यांचेदेखील मोलाचे सहकार्य असल्यामुळेच ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या जागतिक संघटनेने ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या विद्यापीठाला दिला.
समाजातील वंचित आणि विशेष वंचित घटकांसाठी निरनिराळे वैविध्यपूर्ण शिक्षणक्रम सुरु करण्यात आलेत. राज्याच्या कृषी क्षेत्रात सुधारणा करून फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर ठेवण्यात मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्राचे योगदान मोठे आहे. 30 वर्षांपूर्वी लावलेले मुक्त शिक्षणक्रमाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला याचा आनंद वाटतो. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठे असून देखील मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान विद्याशाखेतून आजवर 2 लाख 45 हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले असून पैकी 30 हजार शासकीय सेवेत, 30 हजार खाजगी क्षेत्रात, 40 हजार विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला असून उर्वरित 1 लाख विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. त्याचप्रमाणे कृषिविज्ञान प्रत्यक्ष शेतात नेऊन यशस्वी करण्यासाठी 1994 मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी या विद्यापीठात कृषिविज्ञान केंद्राची स्थापना केली. कष्टकरी, शेतकरी, ग्रामीण युवक-युवतींना कृषितंत्रज्ञानाचे अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे सर्वात महत्वाचे कार्य या केंद्रामार्फत केले जाते. शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांचा आणि संबंधित प्रदेशातील हवामान, पिके, साधनसामग्री या बाबींचा बारकाईने विचार करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या विद्यापीठातून बी.ए. पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून मुक्त शिक्षण प्रणालीद्वारे एमपीएससी / यूपीएससी स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळविता येते हे विद्यार्थ्यांनी सातत्याने दाखवून देत आहेत. ईश्वर कातकडे, रमेश घोलप यांच्यासह असंख्य विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत लातूरचा कौस्तुभ दिवेगावकर देशात पंधरावा व राज्यात प्रथम, कविता ठोणगे हिनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फौजदार झालेल्या पद्मशीला तिरपुडेच्या संघर्षाची कहाणी वंचित समाजातील महिलांना दिशा आणि बळ देणारी आहे. याच विद्यापीठाचीच पदवी घेत निर्मला खळे या शेतकऱ्याच्या मुलीने मुक्त शिक्षणाद्वारे थेट उंच अवकाशात भरारी घेऊन पायलट होण्याचे स्वप्न साध्य करण्याची किमया साधली आहे. पोलीस उपनिरीक्षकपदाच्या ऑगस्ट 2013 मध्ये झालेल्या परीक्षेत सुवर्णा दखणे हिने मागासवर्गीय मुलींच्या गटात राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळवले तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा उपनिबंधकांच्या परीक्षेत क्रांती काशिनाथ डोंबे हे मुलीतून राज्यात प्रथम आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जळगावच्या प्रवीण चव्हाण यांनीही यश मिळवले आहे. तर अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बुलढाण्यातील शेतमजुराचा मुलगा आज उपजिल्हाधिकारी झाला आहे. हवालदार ते उपजिल्हाधिकारी असा यशस्वी प्रवास करून अनुसूचित जातीतून राज्यात दुसरा येण्याचा मान ग्रामीण भागातील सिद्धार्थ वसंता भंडारे तरुणाने केला आहे. यामुळे मुक्त आणि दूरशिक्षण पद्धतीचं प्रभावीपण वारंवार सिद्ध होत आहे.
स्वयं- अध्ययनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन या पुस्तकातील आशयाची मांडणी आणि पुस्तकांची निर्मिती खास वेगळ्या प्रकारची आहे. आतापर्यंत 2500 हून अधिक पाठयपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात अद्ययावत, सुसज्ज अशा ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. आजवर 40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची भूमिका या विद्यापीठाने यशस्वीपणे पेलली आहे. विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांच्या छापील स्वयं अध्ययन साहित्याला पूरक असे दृक – श्राव्य साहित्य केंद्रामार्फत विकसित केले जाते.
भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत तथा ‘सावरपाडा एक्सप्रेस’ ही सध्या मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत आहे. तिच्या खडतर वाटचालीचा खडतर प्रवास मांडणारा यशवार्ता मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे यांचा प्रेरणादायी पाठाचा समावेश गतवर्षी बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला. कविताच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा आता राज्यातील सुमारे 50 लाख विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असल्याने ही बाब विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. कविताप्रमाणेच रीशु सिंग, गौरी राजोळे, शीतल भगत, सुनील खंदारे हे विद्यार्थी देखील मुक्त विद्यापीठातूनच पदवी शिक्षण घेत असून त्यांनी आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत यश मिळवित आहेत.
पुण्यातील श्री भगवानराव नपाते फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून एक हजारहून अधिक मुलींनी रुग्णसहायक शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. येथून शिक्षित झालेल्या मुली नामांकित रुग्णालयांत नोकरी करताहेत. विशेष म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींच्या विकासासाठी येथे भर दिला जातोय. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्र, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, कृषिविज्ञान या विद्याशाखा आणि शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक कौशल्याधिष्ठीत शिक्षणक्रमांचे पर्याय मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या सहकार्याने शिका व कमवा योजनेंतर्गत विद्यावेतन आणि नोकरीची संधी असलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देशातील राज्यपातळीवरचे पहिले मेगा विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची ओळख असून या विद्यापीठाने व्यवसायाभिमुख आणि तंत्रज्ञान शिकविणारे शिक्षणक्रम विकसित करण्यावर भर दिला आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी अनेक अभिनव शिक्षणक्रम सुरु करण्यात आले. बेरोजगारीचे वाढते प्रमाण पाहून मुक्त विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अथवा रोजगाराभिमुख शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत. या विद्यापीठानेही आता शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, उत्तरपुस्तिकांचे स्कॅनिंग, छापील उत्तरपुस्तिका व त्यावर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आदी बाबींसह हे विद्यापीठ तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देत आहे. आज सर्व क्षेत्रांत प्रगती साधून बदल करून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाने आपले अनोखे स्थान मिळविले आहे. अभ्यासकेंद्रे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा, मूल्यमापन, गुणवत्ता, ई-लर्निंगची उपलब्धता, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, व्यवहारातील पारदर्शकता, समाजातील विशेष वंचित घटकांसाठी विशेष शिक्षणक्रम आणि शिक्षण प्रक्रियेला साहाय्यभूत अशी कार्यक्षम व्यवस्था उभारली आहे. एकंदर केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वेगळा ठसा उमटविण्याचा सततचा ध्यास विद्यापीठाच्या भावी वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.