नाशिक – गंगावाडी परिसरातील कालव्यात पडल्यानंतर गटांगळ्या खाणाऱ्या एका युवकाला वाचविण्यासाठी भोसला मिलीटरी कॉलेजमधील एनसीसीच्या छात्रांनी पाण्यात उडी घेतली. त्याला इतर साथीदारांच्या मदतीने वरही काढले पण दुर्देवाने त्या युवकांचा मृत्यू झाला.
एनसीसी छात्रांच्या याच कामगिरीने प्रभावित होऊन त्यांना कमांडिंग ऑफिसर एनसीसी वन महाराष्ट्र बटालियन चे कर्नल वत्त्सा यांच्या हस्ते आज `प्राऊंड रामदंडी` बॅचने गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी,उपप्राचार्य एस.डी.कुलकर्णी,मेजर विक्रांत कावळे, श्रीमती एस.एस.कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्याचे असे झाले, दोन दिवसांपूर्वी गंगावाडी,पिंपळगाव परिसरातील कालव्यात प्रथमेश मच्छिंद्र तिवडे हा युवक मखमलाबाद परिसरातील कालव्यात पडला. खोल कालवा आणि पाणी जास्त असल्याने तो गटांगळ्या खावू लागला. त्याने आरडाओरड केली,पण कुणी वाचवायला पुढे धजावले नाही. थोड्यावेळात त्या ठिकाणी गर्दी झाली.याच भागात पुढे फिरण्यासाठी गेलेल्या भोसला कॉलेजमधील एनसीसीच्या आशुतोष जाधव( टीवायबीए आणि सद्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक) आणि संदीप सोनी यांना गर्दी दिसली. सोनी याने बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना घटनेबद्दल विचारले असता युवक पाण्यात बुडाल्याची त्यांना माहिती मिळाली.
जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी
संदीप सोनी यांनी आपले प्रशिक्षक आशुतोष यांना संबंधीत युवक कालव्यात बुडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर आशुतोष धावत आले आणि त्यांनी कालव्यात उडी घेतली. खोलवर गेल्यानंतर त्यांना एका युवकांचा मृतदेह हाताला लागला.,पण एकट्याने त्यांना त्या युवकाला वर आणणे शक्य झाले नाही.आशुतोष वर आले आणि त्यांनी संदीपला सर्व माहिती दिली. पण दोरीसारखे साहित्य उपलब्ध झाले नाही. अखेर त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या पॅटींचे बेल्ट काढले तसेच उपस्थितांकडील बेल्ट जमा करत सर्व बेल्ट एकत्रीत बांधून आशुतोष खाली गेले आणि त्यांनी बुडालेल्या युवकांच्या अंगाभोवती ते बांधले आणि त्यानंतर प्रथमेशला वर काढण्यात आले. त्यानंतर आशुतोष व संदीप यांनी त्यांच्या छाती,पोटावर दाब देत शरीरातील पाणी काढले, पण त्याचा उपयोग झाला नाही, प्रथमेचचा मृत्यु झाल्याने अखेर तो मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. आपल्या जीवाची पर्वा न करता आशुतोष व संदीप यांनी स्वतः प्रयत्न केले. त्याबद्दल भोसलाच्या या एनसीसी छात्रांचा आज गौरव करण्यात आला.
पुन्हा एकदा रामदंडीची कौतुकास्पद कामगिरी
दहा ते बारा दिवसांपुर्वी आनंदवल्ली परिसरात रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत पडलेल्या आणि गळ्यावर धारदार शस्त्रांचे वार असलेल्या एका वृध्दाला भोसला महाविद्यालयाच्या एनसीसीच्या छात्रांनी उचलून मदत करत तातडीने गुरुजी रूग्णालयात पोहचवत उपचारांसाठी आवश्यक ते कष्ट घेतले होते. ही घटना पाहण्यासाठीही त्यावेळी बघ्यांची संख्या मोठी होती, काहीजण शुटींग करत होते, पण मदतीसाठी कुणीच आले नव्हते,रामदंडीच्या या कार्याबद्दल त्यावेळी त्यांचाही असाच गौरव करण्यात आला होता. रामदंडीने एनसीसीतून मिळत असलेल्या मदत,संघटनांच्या शिकवणीचा आज पुन्हा प्रत्याय आला. भोसलाच्या रामदंडीनी पुन्हा कौतुकास्पद कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.