भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची आज (११ सप्टेंबर) जयंती आहे. भूदान चळवळीचे प्रणेते आणि आपल्या कृतीतून बहुविध संदेश देणाऱ्या विनोबाजींचे जीवन खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरित्राची ओळख करुन देणारा हा लेख…
– मुकुंद बाविस्कर
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ही सत्य घटना आहे, सुमारे 70 वर्षापूर्वीची… एक महापुरुष आपल्या सहकाऱ्यांसमवेत दक्षिण भारतात परिभ्रमण करीत असताना एका खेडेगावात पोहोचला. तेव्हा पोट खपाटीला गेलेले आणि फाटक्या कपड्यातील गोरगरीब लोक एका ठिकाणी बसून अन्नावाचून तडफडत होते. त्यावेळी या महापुरुषाबरोबर असलेला एक सहकारी त्या गरीब लोकांना म्हणाला, “तुम्ही मेहनत करून पोट का नाही भरत?” त्यावेळी त्या गावकर्यांनी सांगितले की, “बाबा, कसे भरणार पोट? आम्हाला कोणी काम देत नाही, आमच्याकडे जमीन नाही, कुणी भाकरीचा तुकडा देत नाही”, त्यावेळी त्या महापुरुषाचे मन हेलावले, तो महापुरुष म्हणजे आचार्य विनोबा भावे होत. आणि ते गाव होते, तेलंगणातील पोचंपल्ली तसेच तो दिवस होता, दि. 18 एप्रिल 1951चा. आचार्य विनोबा भावे यांनी जमीनदारांना आवाहन केले की, या गोरगरिब बांधवांना वाचवा. आपल्याकडे शेकडो एकर जमीन आहे, त्यातील एक तुकडा तरी या बांधवांना द्या. आचार्यांच्या या आवाहनाने आणि भावपूर्ण भाषणाने काही धनिक जमीनदार आणि भांडवलदार लोकांचे मन द्रवले. त्याच वेळी रामचंद्र रेड्डी नावाच्या एका गृहस्थाने आपली शंभर एकर जमीन गोरगरिबांसाठी दान दिली. त्या पाठोपाठ आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो जमीनदार आणि दानशूर लोकांनी गोरगरीब आणि भूमिहीनांना जमीन दान केली.
विनोबा भावे यांचा हा भूदान यज्ञ सुमारे एक तपापेक्षा जास्त काळ म्हणजे तेरा वर्षे चालला. या काळात आचार्य विनोबा भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 40 हजार मैलांची वाटचाल केली. तेलंगणातून सुरू झालेली ही यात्रा आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओरिसा मधून बिहारमध्ये पोहोचली. या काळात विनोबाजींनी सुमारे 2 हजार भाषणे केली. विनोबा यांची प्रत्येक सभा हा नवा विचार होता. चंबळच्या खोऱ्यात त्यांनी अनेक डाकूंचे मनपरिवर्तन करून त्यांना नवा जीवन मार्ग दाखविला. आपल्या भारत भ्रमण यात्रेत त्यांनी सर्वोदय संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. तो सफल करण्यासाठी त्यांना अहोरात्र प्रयत्न केले. देशातील सर्व स्तरातील गोरगरीबांना अन्न, वस्त्र, निवारा आणि हक्काचा एखादा छोटासा तरी जमीनीचा तुकडा मिळावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यासाठी त्यांना महात्मा गांधीजी यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले होते.
विनोबा भावे यांना बालपणापासूनच संन्यस्त वृत्तीचे आकर्षण होते. त्यांचे मूळ गाव वाई (जि. सातारा) होय. त्यांचे वडील नरहरीपंत आणि आई रखुमाबाई हे शिवभक्त होते. पेण तालुक्यातील गोगादे या गावी दि. 11 सप्टेंबर 1895 रोजी विनोबा भावे यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विनायक होते, महात्मा गांधी त्यांना विनोबा म्हणत, तेच नाव पुढे रूढ झाले. वडील बडोद्याच्या कलाभवन संस्थेत नोकरीला असल्याने विनोबांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बडोदे येथेच झाले. त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे वाचन केले. इ.स. 1926 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी मुंबईला परीक्षा देण्याकरता जात असताना वाटेतच त्यांनी सुरतला उतरून वाराणसी म्हणजेच काशी या तिर्थक्षेत्राची वाट धरली, आणि तेथूनच त्यांच्या जीवनाचा मार्गच बदलला. वाराणसी येथे त्यांनी पंडित सभेत द्वैत-अद्वैत वादात पंडितांना हरविले. काशीला विद्यार्जन करून एकीकडे हिमालयात जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता. तर दुसरीकडे त्यांना बंगालमधील क्रांतिकारकांचेही आकर्षण वाटत होते. त्याचवेळी काशीमध्येच त्यांनी महात्मा गांधी यांचे विचार ऐकले आणि त्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी हिमालयाची किंवा बंगालची वाट धरण्याऐवजी अहमदाबादानजीक महात्मा गांधी यांच्या कोचरब आश्रमाचा मार्ग निवडला. त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली तो दिवस होता, दि. 7 जून 1916 आणि विनोबांचे वय होते 21 वर्ष. या वयात मुले उच्च शिक्षणाची वाट निवडून पुढील नोकरी-व्यवसायाची आणि सुखी संसाराच्या जीवनाची स्वप्ने पाहतात. याच वयात त्यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली.
पुढील वाई येथील प्रज्ञा पाठशाळेत स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याकडे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आदींसह योगाभ्यास करून दहा महिन्यातच प्रगती केली आणि महात्मा गांधी यांची शाबासकी मिळविली. वास्तविक महात्मा गांधी कुणालाही सहजासहजी शाबासकी देत नसत. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्धा येथे इ. स.1921 मध्ये सुरू झाली. त्याचे प्रथम आचार्य म्हणून विनोबांजीचा निवड करण्यात आली. विनोबाजी कृषी संस्कृतीचे प्रणेते होते. इ.स. 1930 आणि 32 च्या सविनय कायदेभंगात त्यांनी कारागृह देखील भोगला होता. इ. स. 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधी यांनी विनोबाजींची निवड केली होती. धुळ्याच्या कारागृहात गीतेवर त्यांनी 18 प्रवचने दिली. ही प्रवचने साने गुरुजी यांनी लिहून घेतली, त्यातूनच गीतेवर सुंदर भाष्यग्रंथ तयार झाला. 1936 पासून ते 1980 पर्यंत ते वर्धा नजीकच्या पवनार येथील परंधाम आश्रमातच राहिले. मधल्या काळात भूदान यज्ञासाठी एक तप भारतभर फिरले. परंतु अध्यात्माची ओढ असल्याने संन्यस्त जीवन जगणाऱ्या या महापुरुषाने दि. 15 नोव्हेंबर 1982 रोजी अखेरचा श्वास आश्रमातच घेतला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)