भास्कर सोनवणे, इगतपुरी
भूतांची शाळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अतिदुर्गम भगतवाडी जिल्हा परिषद शाळेत टीव्हीवरची शाळा सुरु झाली आहे. या शाळेत धामडकीवाडी पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील अनेक अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये कोरोना संसर्गामुळे शाळांमधला किलबिलाट स्तब्ध झाला आहे. धामडकीवाडी (ता. इगतपुरी) येथील आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टाकाऊ साहित्यापासून निर्मित टीव्हीवरची शाळा हा लक्ष्यवेधी उपक्रम सुरु केला. राज्यभर या उपक्रमाची शिक्षणतज्ज्ञ, टिलीमिली आदींसह अनेक शाळांनी प्रेरक दखल घेतली आहे. त्यानुसार भगतवाडी जिल्हा परिषद शाळेतही हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्या आर्थिक सहाय्याने भगतवाडी येथे ४८ आदिवासी विद्यार्थ्यांना टीव्हीद्वारे प्राथमिक शिक्षणाचे धडे सुरु करण्यात आले आहेत. ६ विद्यार्थ्यांसाठी एक अशा पद्धतीने एकूण ८ टिव्ही फाऊंडेशनने उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भूतांची शाळा म्हणून परिचित असलेल्या शाळेत टीव्हीवरची शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
भगतवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली आहेर, सौरभ अहिरराव यांनी धामडकीवाडी येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अजमेरा यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. केबल व्यावसायिक अमजद पटेल यांनी टाकाऊ साहित्यापासून टीव्हीवरच्या शाळेच्या तांत्रिकतेने सुरुवात केली. वाडीतील ८ घरांतील विद्यार्थी आता टीव्हीपुढे धडे घेत आहेत. त्यासाठी शाळेतून प्रसारण केबल जोडण्यात आली आहे. अजमेरा यांच्या हस्ते भगतवाडीत टीव्हीवरच्या शाळेचा शुभारंभ करण्यात आला.
स्वयंसेवक भोरू भगत, रामचंद्र भगत यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले आहे. गट शिक्षणाधिकारी अशोक मुंढे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नगर जिल्ह्यातील आकोले तालुक्यातील चांदगीरवाडी शाळेतही टीव्हीवरची शाळा सुरू झाली आहे.
म्हणून भूताची शाळा म्हणून प्रसिद्ध
भगतवाडी शाळेची इमारत पूर्वीच्या स्मशानभूमीवर बांधण्यात आली असल्याने या गावातील नागरिक पूर्वी विद्यार्थ्यांना भीतीमुळे शाळेत पाठवत नव्हते. मुले आजारी पडतात असे अनेक समज-गैरसमज होते. काही महिन्यांच्या दीर्घ प्रयत्नांनी प्रमोद परदेशी यांनी नागरिकांचे मत परिवर्तन केले. त्यामुळे या शाळेची भूतांची शाळा म्हणून ओळख आहे. या शाळेतून टीव्हीवरच्या शाळेद्वारे घराघरात ज्ञानगंगा गेल्याने आदिवासी नागरिकांनी जल्लोष केला आहे.
—
भगतवाडी येथे ऑनलाईन शिक्षणाला नानाविध समस्या असल्याने आम्ही शिक्षक चिंताग्रस्त होतो. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण व्यर्थ जाण्याचा मोठा धोका होता. प्रमोद परदेशी यांनी निर्मित केलेला प्रयोग राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. अजमेरा यांच्या मदतीने तो यशस्वी झाला. विद्यार्थीही अभ्यासात रमल्याचे पाहून अत्यानंद होत आहे.
– वृषाली आहेर, मुख्याध्यापिका, भगतवाडी