नाशिक – बनावट कागदपत्राच्या आधारे ठकबाज दाम्पत्याने दुसऱ्याचा भूखंड परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याने बनावट नावाने बँक खाते उघडून पाच लाख रूपयांचा अपहार केला असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने शहरात अनेकांना गंडविले असून त्यांच्यावर इगतपुरी,उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश दामोदर कटपाल आणि कोमल दामोदर कटपाल अशी संशयीत दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी दिपा अशोक वच्छानी (रा.सेरिनमेडोज,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वच्छानी यांच्या मालकीचा शहरातील सर्व्हे नं. ६५ – २ अ,मध्ये प्लॉट १७ हा ३०० चौ.मि.भूखंड आहे. सन. २०१७ मध्ये संशयीत दाम्पत्याने बनावट कागदपत्राच्या आधारे हा प्लॉट आपला असल्याचे भासवून शालिनी चंद्रकांत पोरजे आणि ज्योती बजरंग शिंदे यांना विक्री केला. याबाबत त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात सह दुय्यम निबंधक वर्ग – २ यांच्या कार्यालयात नोंदणीकृत साठेखत करारनामा करण्यात आला. यावेळी भामट्या दाम्पत्याने बनावट कागदपत्र सादर करून वच्छानी यांच्या ऐवजी संशयीत महिलेस उभे करून हा करारनामा केला. तसेच पोरजे आणि शिंदे यांनी दिलेले धनादेश वटविण्यासाठी एका बँकेत याचप्रकारे संशयीत महिलेचा फोटो आणि वच्छानी याच्या नावाचा वापर केला. या बँक खात्यातून पाच लाखाची रोकड संशयीतांनी पदरात पाडून घेतल्याचे समोर आले असून ही बाब लक्षात आल्याने वच्छानी यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे करीत आहेत. दरम्यान संशयीत दाम्पत्याने याप्रकारे अनेकांना गंडविले असून त्यांच्या विरूध्द इगतपुरी,उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात विविध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.