नाशिक – शुक्रवारी नाशिक मधील ‘मराठा मोर्चा समन्वयक’ पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे कळाल्यानंतर भुजबळ यांनी आपल्या कार्यालयाकडून मोर्चा समन्वयकांना सकाळी १०.३० वाजता भेटण्यासाठी या किंवा त्र्यंबकेश्वर येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रम झाल्यांनतर दुपारी १.३० वाजता या मी कार्यालयात आपल्याला भेटण्यासाठी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले होते. तरी देखील भुजबळ यांच्याविषयी काही संघटनाकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रक माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते नाना महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या त्र्यंबकेश्वर उपबाजार समितीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित होता. तसेच त्र्यंबकेश्वर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातीची कोरोना सद्यस्थिती आढावा बैठक नियोजित करण्यात आलेली होती. त्यानुसार त्र्यंबकेश्वर उपबाजार समितीतील भूमिपूजन कार्यक्रम वेळेत आटोपून भुजबळ यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोना आढावा बैठक सुरु असतांना आंदोलकांना दिलेल्या १.३० वाजेच्या वेळेत भेटण्यासाठी दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठक पुढे सुरु ठेवण्याच्या सूचना देऊन नाशिकला निघाले होते. त्यादरम्यान कार्यालयाच्या वतीने मराठा मोर्चा समन्वयकांना बसण्याची व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. परंतु छगन भुजबळ हे तेथून निघाल्यांनंतर दहा मिनिटात कार्यालयात पोहोचणार असल्याचे मोर्चा समन्वयकांना कळताच मुद्दामून गाजावाजा करून भडकाऊ भाषणे करत भुजबळ कार्यालयात पोहचण्याच्या अगोदरच ते निघून गेले. त्यानंतर भुजबळांच्या विरोधात चुकीच्या बातम्या समाजात पसरविल्या गेल्या.
मराठा मोर्चा समन्वयकांमधील काही विरोधक राजकीय हेतूने प्रेरित होऊन छगन भुजबळविरोधात खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. तसाच प्रकार मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भुजबळ कार्यालयात पेढे वाटण्यात आले अशा आशयाच्या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्या होत्या. त्याबाबत असे काही घडलेले नाही असा खुलासा देखील करण्यात आला होता. काही लोक मुद्दामून समाजात तेढ पसरविण्यासाठी तसेच छगन भुजबळ यांना हेतुपुरस्करपणे बदनाम करण्यासाठी अपप्रचार करण्याचे कारस्थान करत आहेत. मराठा आरक्षण लढाई आता सुप्रीम कोर्टात आहे. शासनाद्वारे कोर्टात ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न समाजाला करावयाचा आहे. परंतु ते बाजूला ठेवून मुद्दाम भुजबळ यांनी टार्गेट करणे आणि वितुष्ट वाढविणे यातून मूळ मुद्दा मागे पडतो आहे. हे समाज बांधवानी लक्षात घ्यायला हवे.
त्यामुळे छगन भुजबळांबद्दल समाजातील काही कटकारस्थानी लोकांनी घेतलेल्या या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत. भुजबळ मराठा समाज आरक्षणासाठी नेहमीच पाठींबा राहिलेला आहे. तसेच यापुढेही कायम राहणार आहे, याची नोंद सर्व मराठा मोर्चा समन्वयकांनी व मराठा समाज बांधवांनी घ्यावी असेही या पत्रकात म्हटले आहे.