नाशिक – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चिरंजीव जय शहा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. जय शहा हे सध्या भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआय)चे सचिव आहेत. मात्र, त्यांचे कर्तृत्व नक्की काय आहे, असा प्रश्नच भुजबळांनी विचारला आहे.
शरद पवार यांनी कधी क्रिकेट खेळले होते का असा प्रश्न उपस्थित करीत सदाभाऊ खोत यांनी पवारांना लक्ष्य केले होते. यासंदर्भात भुजबळांना विचारले असता ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, क्रिकेट सोडून अन्य विषयावर बोलतांना जपून बोलावं, हे सचिन तेंडुलकरला सांगण्याचा अधिकार शरद पवार यांना आहे. पवारांनी फक्त क्रिकेटचे नाही तर कबड्डी, कुस्तीचा प्रचार-प्रसार करण्याचे मोठे काम केले आहे. क्रिकेटसाठी पवाराचे मोठे योगदान आहे. – पवार यांच्यामुळेच अनेक क्रिकेटपटूंना कमी-जास्त प्रमाणात मानधन मिळायला सुरुवात झाली, असा दावाही भुजबळांनी केला. सध्या क्रिकेटच्या क्षेत्रात अमित शहांच्या चिरंजीवाचा अचानक उदय झाला आहे. त्यांचं कर्तृत्व काय, हे कुणालाही माहित नाही, अशी खोचक टिपण्णीही भुजबळ यांनी केली.
