नाशिक – सुयोग्य नियोजनातून समृद्धी महामार्गाची उर्वरित कामे शिघ्रगतीने पूर्ण करावीत, अशा सुचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिर्डी सिन्नर सहपदारी रस्ता व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या सिन्नर इगतपुरी परिसरातील कामांची पहाणी दौऱ्यात सिन्नर येथे गोंदे तालुक्यातील दिलीप बिल्डकॉन प्रा.लि. यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते.
यावेळी आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तथा सचिव ए. बी.गायकवाड, अधीक्षक अभियंता आर.पी. निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, डी.के.देसाई, एन.के. बोरसे, पी.व्ही. सोयगावकर, दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प संचालक मनीष मिश्रा, एन.एच.ए.आयचे प्रकल्प संचालक बी.एस.साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती देतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता ए. बी.गायकवाड म्हणाले, पॅकेज 12 अंतर्गत पाथरे खु. ते सोनारी या 45.64 कि.मी महामार्गावरील 11 लहान पुल, व 7 मोठे पूल यांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पॅकेज 13 अंतर्गत सोनारी ते तारंगपाडा या 45.64 कि.मी महामार्गावरील 2 मोठे पुल, 5 लहान पुल, 1 बोगदा, 3 प्लायओव्हर यांचे काम प्रगतीपथावर असून 3 लहान पूल पूर्ण झाले आहेत. समृद्धी महामार्ग प्रकल्प डिसेंबर 2021 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पा अंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा साडे आठ लाख बांबूची झाडे लावण्यात येणार आहेत. प्रतिदिन किमान चारशे मीटर काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहितीही सादरीकरणाद्वारे श्री.गायकवाड यांनी यावेळी पालकमंत्री यांना सादर केली.
या बैठकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाथरे खु. ते सोनारी ता.सिन्नर तसेच सोनारी ते तारांगणपाडा व इगतपुरी येथील सुरू असलेल्या कामांची पहाणी केली.
इगतपुरी येथील प्रिंपी येथे पाहाणी दरम्यान घेण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी झालेल्या कामांचा आढावा घेवून ग्रामस्थांची निवेदने स्वीकारली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकोटे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य गोरख बोडके, घोटी बाजार समितीचे सभापती संदिप गुळवे आदीसंह ग्रामस्थ उपस्थित होते.