भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हटले जाते, प्रत्येक मनुष्याला जीवनात जगण्यासाठी तीन मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय.आज दि. १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा करण्यात येतो, त्या निमित्त विशेष लेख…
केवळ मानवालाच नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक सजिव प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांना देखील जगण्याकरिता किंवा जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज लागते. कोणताही मनुष्य हा अन्नाशिवाय फार दिवस जगू शकत नाही. कारण शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी होय .या पेशी जिवंत राहण्यासाठी त्यांना पोषण लागते . ते वेगवेगळ्या अन्न घटकांमधून मिळते . त्याकरिता ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले, कॅल्शियम फॉस्फरस, लोह, आयोडिन, जीवनसत्व असे घटक लागतात . हे सर्व घटक आपल्याला अन्नातून मिळतात, म्हणून अन्न किंवा आहार यांचा आरोग्याशी अतिशय जीवनाचा जवळचा संबंध आहे. त्यासाठी प्रत्येकाला योग्य अन्न मिळायला हवे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
दि. १६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत अन्न व कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली. त्याची आठवण म्हणून तेव्हा पासून हा दिवस दरवर्षी जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगात आजही सुमारे ९० कोटी लोक उपाशी राहतात. ही संख्या येत्या दहा वर्षात निम्म्यावर आणण्याचा निर्धार बहुसंख्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या विकास धोरणामध्ये त्याचा समावेश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न करता जगभरातील लोकांना पुरेसे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन जगातील सर्व प्रगत आणि विकसनशील देशांना करण्यात आले आहे. दाक्षिण आफ्रिकेतील अनेक मागास देशात अन्नावाचून दरवर्षी हजारो लोक मरतात ही वस्तुस्थिती आहे.
भारतात देखील अनेक राज्यात आदिवासी भागात कुपोषणाची मोठी समस्या आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटकाळात अन्न आणि योग्य आहार यासंबंधीच्या समस्या वाढल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने अनेक लोकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या, छोटया उद्योग-
व्यावसायावर गंडातर आले, त्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार होत असताना दुसरीकडे डॉक्टर काळजीपोटी सर्वांना पुरेसा आणि सकस आहार घेण्याचा सल्ला देत आहेत. यातून योग्य मार्ग काढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. कोरोनाच्या संकटात काळात अनेकांचे रोजगार बुडाले आणि काही माणसे उपाशीपोटी जगू लागली, अशा काळामध्ये शासकीय मदतीबरोबरच अनेक सामाजिक संस्था संघटना धावून आल्या. त्यांनी निराधारांना अन्न पुरवण्याची मोहीम राबवत ,अन्नाची पाकिटे वाटप करण्याचे काम सुमारे चार ते सहा महिने केले. हे सेवाभावी कार्य निश्चितच आदर्श आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येकाच्या मुखी रोज दोन घास तरी पडायला हवेत.
आपल्या देशात आहार प्रश्नाशी संबंधित अनेक आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. एकीकडे सकस अन्न नसल्याने कुपोषित बालके जन्माला येतात. तर दुसरीकडे फास्टफुड खाण्याचे प्रमाण वाढल्याने खात्यापित्या घरातील मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच अनेक आजार निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याकरिता चौरस आहार घ्यावा, म्हणजे आहारात मेदाचे पदार्थ २५ टक्केच असावेत, कर्बोदकांचा वापर वाढवावा, रोज फळे- पालेभाज्या घ्याव्यात, साखर, मोठ आणि तेल यांचा वापर जास्त नको तर प्रमाणात असावा, असे आहार तज्ज्ञ सांगतात .
भारतीय संस्कृतीत अन्नपदार्थांना अन्नपूर्णा देवी असे म्हटले जाते. कोणतेही अन्न वाया घालवू नये, कारण अन्नधान्य निर्माण करण्यासाठी बळीराजाला खुप काबाडकष्ट करावे लागतात. देशात यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना प्रचंड पावसाचा तडाखा बसला . शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. उभी पिके वाहून गेली ,अन्न पिकवणारा शेतकरी कोलमडून पडला त्याचाही विचार या जागतिकअन्नदिनी व्हायला हवा, इतकेच सांगावेसे वाटते.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)