मुंबई – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३ झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह २० जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकले असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
भिवंडीतली ही तीन मजली इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीत ४० सदनिका होत्या, ज्यामध्ये जवळपास दीडशे लोक राहत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भिवंडी पालिका हद्दीत क्लस्टर योजना आणावी लागेल, त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं