कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
नाशिक – कवींमध्ये मित्रता असते. साहित्य आणि कलेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये त्या दर्जाची मित्रत्वता पाहायला मिळत नाही. दुसरीकडे कवी एकमेकांना भेटून एकमेकांशी वादावादी आणि चर्चा करतात. भाषा आणि संस्कृतीचे कवी वाहक असल्याचे प्रतिपादन लेखक रंगनाथ पठारे यांनी केले.
कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता .२१) कुसुमाग्रज स्मारकात लेखक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. लेखक रंगनाथ पठारे म्हणाले, कवी स्वतःच्या हृदयाने जपलेले काळीज कवितेच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवतो. सामान्य दृष्टीला जे दिसणार नाही ते कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. ते राजू देसलेंच्या कवितेत ठायीपणे दिसत आहे. ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रह भाषेचा व आशय यांचा वेगळा विचार आहे ही मराठी साहित्यातील नवी रुजवात आहे आणि ती नाशिकच्या सुपुत्राने दिली आहे. त्यामुळे त्यांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
विश्र्वास ठाकूर म्हणाले की ,एक समृद्ध प्रतिभेचा हा कवी असून ,जगण्यातून आलेले अनुभव तो कवितेतून मांडतो ,भवतलावर त्याची बारीक नजर असून सुख दुःखाचे प्रतिबिंब राजुच्या कवितेत अलगद येते. माझ्या बँकेत काम करणाऱ्या राजुचा मला अभिमान असून अनेक चांगल्या कवितांना त्याने साहित्यविश्र्वात रसिकांसमोर आणले आहे हे अभिमानास्पद आहे,कवितेची मोठी परंपरा तो पुढे नेत आहे खऱ्या अर्थाने ही नव्या पिढीची कविता आहे.
‘अवघेचि उच्चार’ या कविता संग्रहातील निवडक कवितांचे वाचन अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र व डॉ. निर्मोही फडके यांनी केले. कवितासंग्रहात एकूण ५१ कविता आहेत. विश्वास ठाकूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी कवी राजू देसले यांच्या कवितांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक कवी प्रकाश होळकर यांनी केले नाटककार जयंत पवार यांच्या शुभसंदेश चे वाचन लोकेश शेवडे यांनी केले स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास रावसाहेब कसबे ,कवी – चित्रकार मंगेश काळे, शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशिका, कवियित्री सुमती लांडे, कवी कादंबरीकार प्रवीण बांदेकर, सरबजीत गरचा, कवी समीक्षक गोविंद काजरेकर, देविदास चौधरी,विनायक रानडे,डॉ मनोज शिंपी,डॉ सुधीर संकलेचा,संदेश भंडारे,नंदन रहाणे,डॉ एकनाथ पगार,विवेक गरुड आदी उपस्थित होते.