मुंबई – अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांना कोरोनाचे निदान झाले आहे. यासंबंधी अधिकृत माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. अनलॉकमुळे हळूहळू सिनेसृष्टी पुर्वपदावर येत असून आता मराठी कलाकार देखील यास अपवाद नाहीत. सुबोध भावे सध्या गोरेगावातल्या घरी असून ते सुखरूप असल्यसिक्सही माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवत असून आवश्यक ते उपचार भावे कुटुंब घेत आहेत. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधी माहिती दिली आहे.
सुबोध यांची पत्नी मंजिरी यांचा कोरोना चाचणी अहवाल सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला. भावे कुटुंबीय गणेशोत्सवासाठी पुण्यात गेले होते. परतल्यावर मंजिरी भावे यांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने त्यांनी त्वरित चाचणी केली. सुबोध यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी मुलगा कान्हा आणि ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तिघांवरही कोरोनाचे उपचार सुरू असून आपण सुखरुप असून सर्वांनी काळजी घ्या अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सुबोध भावे यांनी कोरोना काळात सातत्याने रंगमंच कामगार, कलाकार व गरजू रंगकर्मींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. महाराष्ट्रात चित्रिकरण सुरू होण्यासाठीही पुढाकार घेणाऱ्या मोजक्या लोकांत सुबोध भावे सहभागी आहेत.