नवी दिल्ली – बांगलादेशच्या स्थापनेपूर्वी म्हणजे १९६५ मध्ये बंद झालेली रेल्वे लाईन तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश दरम्यान असलेला रेल्वे संपर्क नव्याने प्रस्थापित होणार आहे. विशेष म्हणजे भारताची बांगलादेश सोबतची ही मैत्री पाकिस्तानसाठी इशारा समजला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना हे दोन्ही थोड्याच वेळात या रेल्वेला ग्रीन सिग्नल देणार आहेत.
पश्चिम बंगालच्या हल्दीबाडी आणि बांगलादेश येथील चिलहटी यादरम्यानचा रेल्वे संपर्क १९६५ मध्ये तुटला होता. बांगलादेशची स्थापनाही त्यावेळी झालेली नव्हती. चिलहटी हा भाग त्यावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये होता. आज (१७ डिसेंबर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हस्ते या या रेल्वेलाईनचे उद्घाटन होईल व त्यानंतर नागरिकांसाठी सेवा खुली होणार आहे, अशी माहिती उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वे (एनएफआर)च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी चिलहटी ते हल्दीबाडी या दरम्यान एक मालगाडी धावेल. एनएफआरच्या कटिहार डिव्हीजनचा हा भाग आहे. परराष्ट्र खात्याने रेल्वे अधिकाऱ्यांना हा मार्ग सुरू होणार असल्याबाबत अधिकृत कळविले आहे, असे कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक रविंद्र कुमार वर्मा यांनी सांगितले. हल्दीबाडी रेल्वे स्थानकापासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतचे अंतर साडेचार किलोमीटर आहे आणि बांगलादेशात चिलहटी ते सीमेपर्यंतचे अंतर साडेसात किलोमीटर आहे.
हल्दीबाडी रेल्वे स्थानकाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी दौरा केला असता, ही रेल्वे सुरू झाल्यानंतर सिलीगुडी येथील जलपाईगुडी ते कोलकाता हे अंतर सात तासांत पूर्ण करता येणार आहे, असे सांगितले. यापूर्वी बारा तास लागायचे, हे विशेष. सीमेवरील कारवाया आणि गेल्या काही वर्षांमधील घडामोडींमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध अत्यंत तणावाचे आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशसोबतची मैत्री पाकिस्तानच्या पोटात दुखणे ठरू शकते. दुसरीकडे या रेल्वेमुळे बांगलादेशमधून भारतात होणाऱ्या घुसखोरीची समस्या सुटणार आहे की वाढणार आहे, अशी चिंताही आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.