कळवण – दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरच्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, छावा संघटना, व्यापारी महासंघ, कांदा उत्पादक संघटना, माथाडी कामगार पदाधिकारी व शेतकरी बांधवानी एकत्र बैठक घेऊन पाठिंबा जाहीर करुन कळवण तालुका बंदची हाक दिली आहे. दरम्यान, दिल्ली येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कळवण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मंगळवारी (८ डिसेंबर) सकाळी नऊ वाजता एसटी स्टँड, कळवण येथे एकत्र जमणार आहेत.
कळवणचे तहसीलदार बी ए कापसे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, भारत बंदला आम्ही पाठिंबा देत आहोत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी पंजाब व हरियाणातील लाखो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आम्ही सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीस शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, छावाचे तालुका प्रमुख प्रदीप पगार, कळवण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक अतुल पगार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितेंद्र पगार, पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम देवरे, रायुका जिल्हा उपाध्यक्ष सागर खैरनार, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दीपक महाजन, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मोयोद्दीन शेख, कांदा उत्पादक संघटनेचे तालुका संघटक मुन्ना पगार आदी उपस्थित होते.