महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली माहिती
नाशिक – दिल्लीतील किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.दिघोळे म्हणाले की, वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भाषा करणारे केंद्रातील विद्यमान सरकार सातत्याने याच्या विपरीत निर्णय घेत असून शेतकरी कायदे असू द्या किंवा शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण असू द्या सर्वच बाबतीत शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याचे बाजार भाव वाढल्याचे निमित्त करून व ग्राहक हित जपण्याचे कारण देत कांद्याची निर्यात बंदी केलेली होती. आज मात्र कांद्याचे दर अगदी उत्पादन खर्चापेक्षाही कमी म्हणजे २ हजार रुपये प्रतिक्विंटल यापेक्षाही कमी झाल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे
कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतरही जर केंद्र सरकार कांद्यावर विविध प्रकारचे निर्बंध घालत असेल तर नुकत्याच मंजुरी केलेल्या तीनही कृषी कायद्यांमुळे भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची शाश्वती काय आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदची हाक देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे लाखो कांदा उत्पादक या बंदमध्ये सहभागी होणार आहे. आता तरी केंद्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत व जगात देशाची कृषिप्रधान अशी असलेली ओळख कायम टिकवावी व शेतकऱ्यांचीही आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शेतकरी हिताचेच निर्णय यापुढील काळात घ्यावे अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली आहे.