भारत-चीन सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. त्यातच चीनने गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. यापार्श्वभूमीवर तेथे नक्की काय घडते आहे? चीनला नक्की काय हवे आहे? नजिकच्या काळात याचे काय परिणाम होणार आहेत, याचा वेध घेणारा हा लेख…
—
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण क्षेत्राचे जाणकार आहेत.)
—
परिकथेतील राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पिंजऱ्यातल्या पोपटात असतो तसा चिनी सेनेचा प्राण भारतीय सैन्याने घेरलेल्या मोल्डो तळात अडकला आहे. हा तळ आता भारतीय सैन्याच्या मगरमिठीतून सुटणे अशक्य आहे, पण हे सत्य पचवणे चिनी नेतृत्वाला अवघड जात आहे.
परवा सोमवारी संध्याकाळी चिनी सैन्याने मोल्डो तळाभोवतीच्या भारतीय सैन्याने व्यापलेल्या अनेक शिखरांपैकी मुखपारा आणि रेझांगला या दोन शिखरांवरून भारतीय सैन्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.
आज मॉस्कोत भारतीय आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची भेट होण्याच्या आधी एखादे तरी शिखर हस्तगत करणे चीनसाठी आवश्यक होते, तसे झाले तरच चर्चेत चीनचे वर्चस्व राहणार होते. पण हे आता अशक्य आहे. असे असले तरी या चर्चेत चिनी परराष्ट्रमंत्री चिनी संरक्षणमंत्र्यांचीच री ओढणार हे स्पष्ट आहे. थोडक्यात भारत चीन यांच्यातला पेचप्रसंग आहे तसाच राहणार आहे.
गलवान खोऱ्यात केली तशी मारामारी करून शिखरांवरील भारतीय सैन्याला हटवणे अवघड आहे. आता चीनला एकतर या शिखरांवर उच्चक्षमतेच्या तोफांचा मारा करावा लागेल किवा अत्यंत काटेकोर मारा करणारे हवाईहल्ले करावे लागतील. पण तसे करणे म्हणजे युद्धाला सुरुवात करणे आहे. आणि युद्धाला सुरुवात झाली की स्पँगूर तलावाजवळील चिनी सैन्य, युद्धसामुग्री आणि लष्करी तळ यांचे थडगे बांधले जाणार आहे. त्यामुळे चीन असे हल्ले करण्याची शक्यता कमी आहे. सध्यातरी चीन आहे तेथेच थांबून छुप्या मार्गाने शिखरांवर चढाई करता येते का हे पाहात राहील. पण जसजशी थंडी पडत जाईल तसतसे इथले वातावरण लष्करी हालचालींसाठी अवघड बनत जाईल, त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य येथे दीर्घकाळ एकमेकांवर बंदुका रोखून बसून राहील, असे दिसते.
भारतीय सैन्याचे हे यश महत्त्वाचे आहे, पण त्यामुळे चिनी सैन्य स्वस्थ बसून राहील असे मानण्याचे कारण नाही. ३४०० किमी लांबीच्या नियंत्रण रेषेवर ते महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन भारताला शह देण्याचा प्रयत्न करत राहील. पण नियंत्रण रेषेवर अशी बरीच ठिकाणे आहेत, जी ताब्यात घेऊन दोन्ही देशांचे सैन्य एकमेकाला शह देऊ शकेल. त्यामुळे आता शिखरे किवा भूप्रदेश ताब्यात घेऊन समस्या सुटणार नाही.
दोन्ही देशांना आता चर्चेच्या टेबलावर येऊन देवाणघेवाण करावी लागेल. लष्करी बळाने हा प्रश्न सुटणार नाही, उलट तो अधिक चिघळेल. थोडक्यात चीनने मे महिन्यात ज्या हेतूने नियंत्रण रेषेवरचा निर्मनुष्य भूभाग ताब्यात घेतला होता, तो हेतू आता विफल झाल्यात जमा आहे. आज दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांत जी बैठक होणार आहे, त्यात नवे काहीही निष्पन्न होणार नसले तरी सतत भेटून चर्चा करीत राहण्याचे ठरले तरी पुरे आहे.
दोन्ही देशांच्या मुत्सद्यांमधील पुढच्या चर्चा यशस्वी होण्याची गुरुकिल्ली लडाखमध्ये उणे तापमानात लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या ‘शौर्य आणि मनोधैर्यात’ आहे, हे मात्र ‘आरामखुर्चीतील पत्रपंडितांनी’ विसरू नये.