भारत-चीन यांच्यातील समझोत्यानंतर काय होणार?
चीन आणि भारत यांच्यात पॅगॅगत्सो परिसरातील जमवाजमव मे महिन्याच्या पूर्व स्थितीत नेण्याचे ठरले आहे. पूर्व लडाखमध्ये केलेल्या दु:साहसामुळे चीनला अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, त्याच्या परिणामी चीनला या भागात सैन्य ठेवणे अवघड झाले आहे. कोअर कमांडर पातळीवरील गेल्या दोन चर्चेत चीनने सैन्य मागे घेण्याचे प्रस्ताव ठेवले, पण भारताने मे पूर्व स्थिती कायम केल्याशिवाय सैन्य मागे घेण्यास नकार दिला. पण चीनचे पूर्व लडाखमधील सर्व गणित चुकल्यामुळे चीनची अवस्था’ सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी झाली.
शेवटी पॅगॅगत्सोच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर ८च्याही मागे आपले सैन्य नेण्याची तयारी चीनने दाखवल्यामुळे तसेच सध्याच्या उणे तापमानात नवे दु:साहस करण्याची चीनची क्षमता नसल्यामुळे भारताने ‘सैन्य व युध्दसामुग्री दोन्ही देशांनी मे पूर्व स्थितीत मागे घ्यावी’ हा चीनचा प्रस्ताव स्वीकारणल्याचे दिसत आहे. लडाखमधील कोंडी फोडायची असेल तर चीनला ही संधी देण्यात काही गैर नाही, पण हा भारताने हिशेबीपणे पत्करलेला धोका आहे, यात काही शंका नाही. अर्थात एवढ्याने लडाखमधील परिस्थिती सुधारणार नाही.
डेपसांग, घोगरा, हाॅटस्प्रिंग आदी विभागातही चीनने सैन्य मागे घेणे आवश्यक आहे. त्याबाबतही चर्चा चालू असेलच. चीनचा धोका आता कमी होईल अशा भ्रमात भारतीय सैन्य अजिबात नाही. उलट पॅगॅगत्सोमध्ये मानहानीकारक तडजोड करावी लागल्यामुळे चीन अधिक धोकादायक झाला आहे. या मानहानीचा वचपा काढण्याचा चीन प्रयत्न करणार हे लक्षात ठेवावे लागेल. अर्थात चीनपुढचे पर्याय आता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहेत. भारत यापुढच्या काळात आपली चीनविरुध्दची क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. अमेरिकेबरोबर भारताचा लष्करी करार झाल्यामुळे चीनची आणखी पंचाईत झाली आहे.
सध्याच्या तडजोडीनुसार भारत उत्तर पॅगॅगत्सो भागात धानसिंग थापा पोस्टपर्यत आपले सैन्य मागे घेईल तर दक्षिण पॅगॅगत्सो भागात ज्या पर्वत शिखरावर सैन्य आहे ते खाली उतरवील. सध्या पर्वतशिखरांवरचे तापमान भयानकपणे खाली आले आहे, त्यामुळे सैन्य वर ठेवण्यात शहाणपण नाही. फक्त शिखरांकडे जाणारे पायथ्याकडचे मार्ग रोखले तरी पुरेसे आहे. अर्थात चीनवर आता विश्वास नसल्यामुळे या भागात सतत विविधमार्गांनी टेहळणी होत राहील. चुशुल भागातील रणगाडे व तोफा दोन्ही सैन्याने मागे घेण्याचे ठरवले आहे पण भारत अशा स्थितीपर्य॔तच ते मागे घेईल जिथून त्या लगेच पुन्हा रणक्षेत्रात आणणे शक्य होईल. दोन्ही देश दररोज 30 टक्के इतके सैनिक पॅगॅगत्सोच्या आघाडीवरून मागे घेतील. हे काम तीन दिवस चालेल व एका आठवड्यात सैन्य व साधनसामुग्री माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल. माघारीची प्रक्रिया आधी चीनने पूर्ण करायची आहे व त्याबाबत प्रत्येक टप्प्यावर खात्री पटल्याशिवाय भारत आपली माघार सुरू करणार नाही.
पंधरवड्यापूर्वी लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सच्या बैठकीत हिवाळा संपल्यानंतर लडाखमध्ये करावयाच्या लष्करी व्यूहरचनेवर विचार करण्यात आला. या हिवाळ्यात चीनने कोंडी फोडण्यासाठी आक्रमक लष्करी हालचाल केली नाही तर तो उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर तशी हालचाल करण्याची शक्यता गृहीत धरून भारतीय लष्कर व्यूहरचना करीत आहे. लष्कराने चिनी आघाडीवर कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवले आहे. हिंदी महासागरात चीनची कोंडी करण्याचा सराव सतत सुरू आहे. चार देशांच्या मलबार कवायती पार पडल्या आहेत. लवकरच याहून अधिक मोठ्या पातळीवर या चारही देशांचे नौदल कवायती करणार आहे. तिकडे अंदमानामध्ये येथील सेनादलाच्या तिन्ही विभागाच्या संयुक्त दलाने स्वतंत्रपणे कवायती करून चीनला भारताशी युध्द सोपे जाणार नाही असा इशारा दिला आहे.
सध्याची तडजोड चीनच्या फायद्याची आहे, पण भारताला अधिक उसंत देणारी आहे. यामुळे चीनचा धोका संपणार नाही. उलट चीन यापुढच्या काळात काय करतो, यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.