जयशंकर आणि वांग यी या भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या काल मॉस्कोत झालेल्या बैठकीत नियंत्रणरेषेवरचा तणाव कमी करण्याबाबत पाच कलमी कार्यक्रमावर सहमती झाल्याच्या बातमीचे स्वागत करण्याची घाई करता येणार नाही. चीनविषयीचा अविश्वास आता मनात इतका खोलवर रुजला आहे की, या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी खरेच झाली तरी दीर्घकाळ त्याकडे सावधपणे बघावे लागेल.
दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्राचे तज्ज्ञ आहेत)
भारताने कैलास पर्वतश्रेणीची शिखरे काबिज करून चीनची घुसखोरी केवळ थांबवलीच नाही तर चीनच्या ताब्यातील प्रदेशात घुसण्याची तयारी दाखवल्यामुळे चीनपुढचे सर्व पर्याय संपले आहेत. या शिखरांवर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांवर गोळ्या झाडण्यात येतील असा इशारा भारताने दिल्यानंतर हे साहस करायचे की नाही असा पेच चिनी लष्करी अधिकाऱ्यांपुढे नक्कीच पडला असणार. कारण घुसखोरांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला तर त्यातला एकही घुसखोर वाचण्याची शक्यता नाही. शिवाय परिस्थिती चिघळली तर भारतीय सैन्य आक्रमक पवित्रा घेऊन मोल्डोचा चिनी तळ व तेथील रणगाडे, चिलखती गाड्या व अन्य युद्धसामुग्रीही नष्ट करू शकते. एवढेच नाही तर स्पँगूर तलावापासून उत्तरेला काही किलोमीटरवरच भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा मानली गेलेली जॉन्सन लाईन आहे, तेथपर्यंत भारतीय सैन्य धडक मारू शकते. तशा परिस्थितीत चिनी सैन्याची परिस्थिती अवघड होईल. याच ठिकाणाहून पुढे ९० किलोमीटरवर तिबेट-झिंगझियांग रस्ता आहे, हा रस्ताही धोक्यात येऊ शकतो.
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उणे तापमानाच्या थंडीत भारतीय सैन्याच्या आक्रमक हालचालींना तोंड देणे चिनी सैन्याला खूप अवघड जाईल, हे ओळखूनच कदाचित चीनने तणाव कमी करण्याची तयारी दाखवली असावी.
चीनने खरेच आपले सैन्य मागे घेतले तरी आता भारत नियंत्रणरेषवरून आपले सैन्य मागे घेण्याची शक्यता कमी आहे. आता ही सीमा कायम सजग व जागरूक राहील. आतापर्यंत नियंत्रणरेषेंवर फक्त गस्त घालण्यापुरताच फौजफाटा होता. त्यातही हिवाळ्यात गस्त फारशी चालू नसायची, त्याचा फायदा घेत चिनी सैन्य इंचइंच पुढे सरकत होते. आता सध्याच्या नियंत्रणरेषेचे काटेकोर संरक्षण भारताला करावे लागेल. एका अर्थी ते बरेच आहे, कारण एकदा सैन्य नियंत्रणरेषेनजिक कायम राहणार म्हटले की, तेथील पायाभूत सुविधा आपोआपच वाढतील व त्याचा परिणाम सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होण्यात होईल.
शिवाय चिनी सैन्याला वाटेल तशी मनमानी करता येणार नाही. लडाख हे आता चीन सीमेजवळील केंद्रशासित राज्य झाले आहे, त्यामुळे या राज्याच्या सीमेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
जयशंकर-वांग यी भेटीत नेमके काय ठरले, सैन्य माघारी कशी होणार आहे वगैरे तपशील कळलेला नाही. तो कळेल तेव्हा त्यासंबंधी काही मत व्यक्त करता येईल. पण एक गोष्ट नक्की आता भारत-पाक नियंत्रणरेषे प्रमाणे भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रणरेषा सतत जागती राहणार आहे.