हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा अन्वयार्थ
“भारतीय हवाईदल चीनच्या तुलनेत कुठेही कमी नाही” हे हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल राकेशकुमारसिंग बहादुरिया यांचं विधान फक्त देशवासियांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेलं विधान आहे असा कुणाचाही समज होण्याची शक्यता आहे, पण उत्तर सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात हवाईदलप्रमुखांनी हे जाणीवपूर्वक विधान केलं आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने घुसखोरी केल्यानंतर भारतीय नेते व लष्करी अधिकारी जी काही विधाने करीत आहेत ती ठरवून व जाणीवपूर्वक करीत आहेत. यापूर्वी लष्करी दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावावर लष्करी उपाय योजण्याचा उपाय भारताकडे आहे, असे विधान केले आणि काही दिवसांतच भारतीय सैनिकांनी कैलास पर्वतश्रेणीतील अनेक शिखरे काबिज करून चीनला चकित केले. आता हवाईदलप्रुखांनी केलेल्या विधानाला त्या संदर्भातच पहावे लागेल.
भारताच्या तुलनेत चीनचे हवाईदल मोठे आहे, हे जगजाहीर आहे, पण असे असले तरी हिमालयातील युद्धात चीनचे हे मोठे हवाईदल फार मोठी कामगिरी करण्याच्या स्थितीत नाही, कारण एकतर चीनचे संपूर्ण हवाईदल हिमालयात आणणे शक्य नाही. चिनी हवाईदलाला तैवान, जपान व अमेरिका यांच्या हवाईदलाशीही टक्कर घ्यायची आहे. त्यामुळे तिकडे बरीच हवाईसामुग्री तैनात करावी लागणार आहे आणि हिमालयात जे काही हवाईदल असेल त्याच्या कामगिरीवर हिमालयातील पर्यावरण व भौगोलिक स्थितीच्या मर्यादा आहेत. त्यामुळे नियंत्रणरेषेवर चिनी हवाईदल हे बचावात्मक स्थितीत आहे. त्यातच भारताकडे मोजकीच का होईनात पण राफाल विमाने आल्यामुळे परिस्थितीत खूप फरक पडला आहे.
चीनने नियंत्रण रेषेवर हवाई आक्रमणाऐवजी हवाई सुरक्षेवर भर दिला आहे. पूर्व लडाखमधील संपूर्ण नियंत्रण रेषेवर चीनने मोठ्या प्रमाणात विमानांवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. शिवाय आपल्या हवाईदलाची अपूरी क्षमता भरून काढण्यासाठी विविध प्रकारचे ड्रोन सज्ज केले आहेत. या खेरीज भारतीय लढाऊ विमानांच्या हालचाली टिपण्यासाठी रडार यंत्रणेचे जाळे उभे केले आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवाईदल कसे काम करणार हा मोठा प्रश्न होता. तसेच पाकिस्तानने दुसरी आघाडी उघडली तर पाकिस्तानच्या ‘एफ – १६’ या विमानांना भारतीय सुखॉय, मिराज आणि तेजस विमाने कशी तोंड देणार हाही प्रश्न होता. पण हवाईदलप्रमुखांनी आजच्या हवाईदलदिनाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत चीन – भारत सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाची स्थिती स्पष्ट केली आहे. सीमेवर तणाव निर्माण झाल्यापासून हवाईदलाची विमाने व हेलिकॉप्टर सीमेवर दररोज घिरट्या घालीत आहेत, या घिरट्या केवळ बलप्रदर्शनासाठी नसतात, त्यामागे शत्रूच्या रडारयंत्रणांची क्षमता जोखणे, शत्रूच्या संपर्क यंत्रणेचा माग घेणे, चीनने आपल्या संरक्षण व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या जाळ्यात गुंफले आहे, या जाळ्याचा भेद करण्याचा मार्ग शोधणे आदी हेतू असतात.
चीनचेही हवाईदल याच हेतूने हालचाली करीत असणार यात शंका नाही. थोडक्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांचे हवाईदल एकमेकांना जोखत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाईदलप्रमुखांच्या या जाहीर विधानांकडे पहावे लागेल. बहादुरिया असेही म्हणाले की, भारतीय हवाईदलासाठी पूर्व लडाख हा एक छोटा विभाग आहे, आमची तयारी ही पूर्ण ३४०० किमी लांबीच्या भारत – चीन सरहद्दीसाठी आहे. या विधानामुळे चीनच्या हवाईदलावर ताण पडणार आहे हे नक्की. गिलगिट बाल्टीस्तान भागातील पाकच्या हवाईतळांचा वापर चीन करीत आहे, यावरून चीनची अवस्था लक्षात यावी, असेही बहादुरिया म्हणाले.
पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाईदलाला जमिनीवर लढणाऱ्या आपल्या लष्कराशी संपर्क ठेवून काम करायचे आहे. तेथे हवाईदल केवळ स्वतंत्रपणे काम करणार नाही, त्याची लष्कराला साथ असणार आहे, त्यामुळे लष्कर व हवाईदल यांच्यातील सुरक्षित व अभेद्य संपर्कयंत्रणा अल्पकाळात प्रस्थापित करणे हे एक आव्हान होते, ते पार पाडण्यात आले आहे, हेही हवाईदलप्रमुखांनी दिलेल्या एका मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.
काही तज्ज्ञांनी पूर्व लडाखमध्ये भारताचे ऑप्टिकल फायबरचे जाळे नसल्यामुळे भारतीय लष्कर हे युद्धच लढू शकत नाही असा निष्कर्ष काढला होता व हे जाळे टाकायला तीन वर्षे लागणार असल्यामुळे भारताची परिस्थिती अवघड आहे असे म्हटले होते, पण एकतर अशी काही समस्याच अस्तित्वात नसावी किवा लष्कर व हवाईदलाने हा प्रश्न योग्यरीतीने सोडविला असावा असे दिसते. एकंदरच चीनबरोबर युद्ध झालेच तर हवाईदलाला मोठी व महत्त्वाची कामगिरी बजावावी लागणार आहे, व त्या दृष्टिने हवाईदलाने तयारी केली आहे, असे दिसते.
चीनचा सर्व भर हा क्षेपणास्त्रांनी युद्ध लढण्यावर दिसत आहे. अगदी जमिनावरील युद्धातही आपल्या सैनिकांना पुढे करण्याऐवजी दूरनियंत्रणातून वापरता येणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्याकडे चीनचा कल दिसत आहे. त्याला भारतीय संरक्षण यंत्रणा कसे तोंड देते, ते पहावे लागेल.
सध्या जपानमध्ये क्वाड गटातील देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक चालू आहे, त्यात जे काही घडेल त्याचा उत्तर सीमेवरील स्थितीवर नक्कीच प्रभाव पडणार आहे. बघू या काय घडते ते…