लडाखमधील चीनचे गणित सपशेल चुकले
चीनने प्रथमच आपल्या पूर्व लडाखमधील लष्करी घुसखोरीचे कारण दिले आहे. चिनी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले की, लडाख भागात भारत पायाभूत सुविधा व रस्ते बांधणीचे काम मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे सध्याचा तणाव निर्माण झाला आहे आणि हा तणाव कमी करायचा असेल तर भारताने हे काम ताबडतोब थांबवावे.
खरे तर चीनने आपल्या ताब्यातील तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत व सर्व मोसमात उपयुक्त ठरणारे रस्ते बांधले आहेत. त्यामुळे भारताने रस्ते बांधून कितीही सैन्य आणले तरी चीन काही दिवसांतच मोठे सैन्य आणून भारताला प्रत्युत्तर देऊ शकतो. पण यातली खरी गोम ही आहे की, चीनचे हे रस्ते फक्त तिबेटच्या पठारी भागातच येऊन संपतात. त्यापुढे जो भारतीय प्रदेश आहे तो अनेक पर्वतरांगांचा आहे. तेथे रस्ते बांधणे व सर्व मोसमात ते टिकवणे अवघड आहे.
विशेषत: अक्साई चीन, लडाख भागात चीनचे रस्ते नियंत्रण रेषेपर्यंत पोहचणारे नाहीत. चीनने बांधलेला तिबेट-झिंगझियांग महामार्ग दौलतबेग ओल्डी ते चुशुल या दरम्यानच्या नियंत्रण रेषेपासून १५० ते २५० किमी दूर आहे. या महामार्गपासून नियंत्रण रेषेपर्यंत रस्ते आणायचे असतील तर चीनला जवळपास एक हजार किलोमीटर खाली उतरावे लागते व पर्वतरांगाची चढउतार करणारे रस्ते बांधावे लागतात.
चीनने सध्या जे काही रस्ते बांधले आहेत ते नियंत्रण रेषेपासून १० ते २० किमी अंतरापर्यंत येतात. तेथून पुढे चिनी सैन्याला नियंत्रण रेषेपर्यंत येण्यासाठी पायपीटच करावी लागते. या क्षेत्रात वाहने वापरता येत नाहीत. या भागातील पर्वत २० हजार फुटापर्यंत उंचीचे आहेत. अनेक ठिकाणी तळी अथवा पाणथळ जागा आहेत. त्या तुलनेत भारताने बांधलेला डोरबुक- दौलतबेग ओल्डी रस्ता हा नियंत्रण रेषेला लगटून जातो. त्यामुळे भारत नियंत्रण रेषा कायम आपल्या देखरेखीखाली ठेवू शकतो, चीनला ते शक्य नाही.
कोणत्याही लष्करी कारवाईत भारतीय सैन्य चीनचे नियंत्रणरेषेकडे येणारे जोडरस्ते (feeder roads) उद्धवस्त करू शकतो किंवा ते ताब्यात घेऊ शकतो. अथवा त्यांचा वापर करून तिबेट-झिंगझिंयांग मार्ग ताब्यात घेऊ शकतो. चीनने अरुणाचल प्रदेशात काही गडबड केली तर लडाखमधून तिबेट-झिंगझियांग मार्ग अडवला की चीनची तिबेटमधील रसद बंद होऊ शकते.
(नकाशा क्र. एक पहा. निळ्या रंगात तिबेट-झिंगझियांग मार्ग व हिरव्या रंगात नियंत्रण रेषेकडे जाणारे जोडरस्ते.)
अक्साई चीन हे तिबेटचे विस्तारित पठार असल्यामुळे तेथपर्यंत चीन वाहने, चिलखती गाड्या आणू शकतो पण त्यापुढचा भारतीय प्रदेश हा अत्यंत उंच पर्वत रांगांचा असल्यामुळे चिनी सैन्याला या भागात लढणे अवघड जाणार आहे. या भागात रसद पोहचवणे हेही एक अवघड काम आहे. या अडचणी भारतीय सैन्यालाही आहेत, पण अशावेळी सैन्याची लढण्याची क्षमता कामी येते. हा सर्व भाग १५ ते २० हजार फूट उंचीच्या पर्वतांचा असल्यामुळे हिवाळ्यात परिस्थिती आणखी अवघड बनते व बंदुकीच्या गोळीने मरण्याऐवजी थंडीनेच सैनिक मरतात.
युद्धाची परिस्थिती निर्माण होताच भारताने मोठ्या प्रमाणात रसद गोळा करण्याचे काम धडाक्याने केले त्याचे कारण हेच आहे. चीनला या भागात हवाई दलाच्या साह्याने रसद व युद्ध साहित्य पोहचवणेही अवघड आहे. कारण सर्वात जवळचा हवाईतळ झिंगझिंयांगमधला खोतान हा २५० किती अंतरावर आहे. बाकीचे सर्व हवाई तळ हे ५००, ७०० व १००० किमी अंतरावर आहेत. (नकाशा क्र. २.)
थोडक्यात चीनचे लडाखमधले गणित सपशेल चुकले आहे. आता हे गणित अचूक सोडवायचे असेल तर चीनला न परवडणारी किंमत मोजावी लागेल. सध्या नियंत्रणरेषेवर जी कोंडी निर्माण झाली आहे, त्यामागचे हेच कारण आहे.
(या लेखातील माहिती व नकाशे डिफेन्स फोरम इंडिया यांच्या सौजन्याने)