कमांडर पातळीवरील चर्चेच्या अपेक्षा
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
भारत आणि चीनमधील कोअर कमांडर पातळीवरील चर्चा आता सुरू झाली आहे. आपण इंचभरही मागे हटणार नाही या चिनी संरक्षणमंत्र्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवरच या चर्चेकडे पहावे लागेल. लडाखमध्ये आता प्रचंड हिवाळा सुरू झाला आहे आणि अशा या वातावरणात निसर्गाशीच युद्ध करावे लागणार असल्यामुळे आपसात लढण्याची वेळ येऊ नये अशीच काहीतरी तरतूद या चर्चेत दोन्ही देश करण्याची शक्यता अधिक आहे. तेवढेच या चर्चेचे महत्त्व आहे. तरीही दोन्ही देशांतील लष्करांत संवाद चालू आहे, ही मोठी आशादायक गोष्ट आहे. दोन्ही देशांना युद्ध नको असेल तर संवाद चालू ठेवावा लागेल. या संवादाच्याआडून रणांगणावर प्यादी पुढेमागे सरकवण्याचे डावपेच मात्र चालू राहतील.
भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत चुशूल भागातील आणखी काही शिखरे ताब्यात घेतली.कैलास श्रेणीतील शिखरे ताब्यात घेतली असली तरी काही पळवाटा शिल्लक राहिल्या होत्या व त्याचा फायदा घेऊन चिनी सैन्य भारतीय सैन्याच्या पिछाडीला येऊ शकले असते, त्यामुळे भारतीय सैन्याने या भागातील आणखी काही शिखरे ताब्यात घेऊन या पळवाटा बंद केल्या आहेत. यामुळे आग्नेयेकडे डेमचोकपर्यंतचा भाग चिनी सैन्यापासून सुरक्षित राहील.
भारताने यासाठी आणखी १२ हजार सैन्य या भागात आणले आहे. चीन भारताशी लढताना एका भारतीय सैनिकामागे आपले किमान पाच सैनिक असे प्रमाण ठेवतो, त्यामुळे भारतीय लष्कर चिनी सैन्यसंख्येवर लक्ष ठेवून आहे. या शिखरांवरून भारतीय सैनिकांना हटवायचे असेल तर चीनला हे प्रमाण किमान दहा सैनिक असे करावे लागेल. ही शिखरे ताब्यात घेण्यामागे चिनी सैन्यदलावरचा ताण वाढवणे हाही हेतू असू शकतो. चिनी सैन्य अधिक क्षेत्रात विखुरलेले राहिले तर त्याचा या जमवाजमवीमागचा जो हेतू आहे तो भरकटू शकतो.
चीनचा भर हा देपसांग भागात चढाई करण्याचा आहे. पण भारताने अन्य क्षेत्रांत किंवा अरुणाचल क्षेत्रात आघाडी उघडल्यास चीनला डेपसांग क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाईल. डेपसांग क्षेत्रात चीनने नियंत्रण रेषेच्या निर्मनुष्य क्षेत्रातला मोठा भाग व्यापला आहे व तेथे जवळपास १२ हजार सैनिक, रणगाडे, चिलखती गाड्या व तोफा आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला त्यांच्या गस्ती ठाण्यांपर्यंत जाणे अशक्य झाले आहे. अर्थात भारतीय लष्कराने तेथे चीनशी तुल्यबळ ठरू शकेल अशी जमवाजमव केली आहे. हा पूर्ण भाग मैदानी असल्यामुळे येथे दोन्ही बाजूंचे सैनिक उघड्यावर आहेत. असे असले तरी हा भाग इतर भागापेक्षा शांत आहे व येथे अजून तरी फारशा लष्करी हालचाली होत नाहीत किवा त्याची चर्चा होत नाही. पण चिनी डावपेचाच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहे. येथे घडणाऱ्या घडमोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.
कैलास शिखरे काबिज केल्यानंतर चिनी सैन्याने एप्रिलपूर्व स्थितीत जावे हा आग्रह भारताने सोडला आहे, कारण तसा आग्रह धरल्यास भारताला ही शिखरेही सोडावी लागतील. ही शिखरे आता सोडणे भारताच्या हिताचे नाही. ही शिखरे ताब्यात आल्यामुळे आता चीनच्या प्रदेशात मुसंडी मारण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे चीनवर कायमचा दबाव ठेवणे शक्य होणार आहे. अन्य क्षेत्रातून चीनला मागे रेटायचे असेल तर भारत आता या क्षेत्रात दबाव वाढवत राहील. पण यामुळे आता जुनी नियंत्रणरेषा बाद होईल आणि नवीच नियंत्रण रेषा अस्तित्वात येईल हेही तितकेच खरे आहे.
भारताचे धोरण चीनच्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याचे आहे, त्यामुळे असेच नेहमी घडत आले आहे व त्याचा लाभ चीनला मिळत आला आहे. पण आता नियंत्रण रेषा जागृत झाली आहे व तेथून दोन्ही देश सैन्य काढून घेण्याची शक्यता नाही. तसे झाल्यास जुने करार मोडीत काढून नवे करार करावे लागतील.
चीनची तीच तर इच्छा आहे. खरे तर या सर्व घुसखोरीमागचा चीनचा हेतू पूर्व लडाखमध्ये १९६२च्या आक्रमणानंतर सोडून दिलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे हा होता, पण भारताने त्वरेने हालचाल करून जमवाजमव केली व चीनला त्याआधीच रोखले. सोबतच्या नकाशात हा भाग निळ्या रेषेत दाखवला आहे. भारताच्या मते नियंत्रण रेषा नकाशात दाखवलेल्या हिरव्या रेषेजवळ आहे. जी चीनला मान्य नाही. भारताने आता आपल्या दावा रेषेचा सतत आग्रह धरला पाहिजे व त्यासाठी सध्याच्या सीमेवर सतत दबाव ठेवावा लागेल. काहीही करून भारताबरोबरचा वाद मिटवला पाहिजे असे चीनला वाटेल, तेव्हाच ही समस्या सुटेल.