तोंड दाबून बुक्क्यांचा मार
गेल्या दोन-तीन दिवसांत चीन आघाडीवर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकतर कोअर कमांडर पातळीवर जी चर्चा होणार आहे, त्यासाठी चीनने वेळ व तारीख देण्यास टाळाटाळ चालवली आहे. ही चर्चा एकदोन दिवसांपूर्वीच अपेक्षित होती, पण चीनने त्यासाठी वेळच दिला नाही आणि ते साहजिक आहे, कारण या चर्चेत घासाघीस करण्यासाठी चीनकडे कुठलाच मुद्दा उरलेला नाही.
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्र तज्ज्ञ आहेत)
भारताने पँगाँगत्सोच्या दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही किनाऱ्यांवर आपली स्थिती मजबूत केली आहे. हे यश सहजासहजी मिळालेले नाही. विशेषत उत्तर किनाऱ्यावरील फिंगर भागात चिनी सैन्यावर चढाई करण्यासाठी भारतीय सैन्याला छोटीशी चकमकच करावी लागली आहे. येथे चिनी सैन्याची स्थिती तोंड दाबून बुक्क्यांचा मार पडावा अशी झाली आहे कारण भारतीय सैन्याने चढाई करून मागे रेटले हे मान्य करणे चीनला परवडणारे नाही.
डेपसांग भागात चीनने मोठी जमवाजमव केली आहे, पण भारतानेही तोडीसतोड जमवाजमव करून परिस्थिती तूल्यबळ केली आहे. एकंदर चीनने घुसखोरी करून जी काही आघाडी घेतली होती तिचा लाभ घेण्याच्या स्थितीत आता चिनी सैन्य नाही. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना संसदेत भारताची भूमिका ठामपणे मांडता आली. दुसरी गोष्ट म्हणजे हिमालय बर्फाने वेढल्या जाण्याआधीच प्रचंड प्रमाणात रसद सामुग्रीची जमवाजमव करून चिनी सैन्याला दीर्घकाळ झुंजवण्याची तयारी भारतीय सैन्याने करून ठेवली आहे.
पुढच्या महिन्यापासून बर्फ पडू लागले की, लडाखकडे जाणारे सर्व रस्ते व वाहतूक बंद होईल. रस्त्यावर साचलेले बर्फ हटविण्याची साधने सैन्याकडे आहेत, पण सैन्य कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे केवळ सहा महिनेच नाही तर वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, पेट्रोल, रॉकेल, दारुगोळा आणि अन्य युद्धसामुग्री सैन्याने जमवून ठेवली आहे. यावरून भारतीय सैन्याचा निर्धार स्पष्ट व्हावा. चिनी सैन्याला हे सर्व अपेक्षित नव्हते.
सीमेवर सध्या सर्व शांत असल्यासारखे दिसते, पण प्रत्यक्षात परिस्थिती तंग आहे आणि अधूनमधून गोळीबाराच्या घटना घडत असल्याचे कळते. चिनी सैन्याने सुरुवातीला आक्रमक हालचाली करून भारतीय सैन्यावर दबाव टाकला होता, पण आता भारतीय सैन्याने हा दबाव पार झुगारून टाकला आहे व आता पुढे भारतीय सैन्य नेमके काय करेल याचा अंदाज चिनी सैन्याला बांधावा लागत आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीन बराच पुढे आहे व त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असे काही तज्ज्ञ सतत सांगत आहेत, पण भारतीय सैन्याचे नेतृत्व त्यामुळे फारसे विचलित झालेले दिसत नाही. कारण हे तंत्रज्ञान काय आहे व त्याला कसे उत्तर द्यायचे याचा काही निश्चित विचार नेतृत्वाकडून झाला असावा असे दिसते.
दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या पाच कलमी समझोत्यात एप्रिलपूर्व स्थिती पुन्हा कायम करण्याचा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा उल्लेख नाही, पण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या राज्यसभेतील कालच्या निवेदनात या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे, ही गोष्ट या समझोत्याविषयी बरेच काही सांगून जाणारी आहे.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल काश्मीर आघाडीला भेट देऊन तेथील बंदोबस्ताची पाहणी केली. लडाखमध्ये लष्करी कारवाई सुरू झाली की, पश्चिम आघाडीवर पाकिस्तान गडबड करण्याची शक्यता भारतीय लष्कराने गृहीत धरली आहे व त्याला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन केले आहे.