भारतीय सैन्याने चुशूल व डेमचोकच्या मैदानी प्रदेशात अचानकपणे टी- ९०, टी -७२ हे रणगाडे आणि बीएमपी -२ ही चिलखती वाहने सज्ज केली आहेत. त्याचे नक्की काय परिणाम होतील, ही तयारी आवश्यक आहे का, याचा उहापोह करणारा हा लेख
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
भारतीय सैन्याने चुशूल व डेमचोकच्या मैदानी प्रदेशात अचानकपणे टी- ९०, टी -७२ हे रणगाडे आणि बीएमपी -२ ही चिलखती वाहने आणून चिनी सैन्यापुढे नवे आव्हान उभे केले आहे. स्पँगूर सरोवर-चुशुल – डेमचोक या परिसरातील सर्व शिखरे भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्याने हा सर्व भाग आता भारतीय प्रभावाखाली आहे. त्यामुळे स्पँगूर गॅप भागात चिनी सैन्याने आणून ठेवलेले रणगाडे डेमचोकपर्यंत आणणे चिनी सैन्याला जमणार नाही कारण हे रणगाडे भारतीय माऱ्यात सापडतील.
१९६२च्या युद्धात चीनने डेमचोकच्या दक्षिणेकडून रणगाडे आणून रेझांगला भागात मारा केला होता, त्यामुळे भारताने आता चुशुल- डेमचोक हा भाग आपले रणगाडे आणून केवळ सुरक्षितच केला आहे असे नाही तर या भागातून अक्साईचीन भागात मुसंडी मारण्यासाठी हे रणगाडे व चिलखती वाहने उपयुक्त ठरतील. डेमचोकपासून तिबेट -झिंगझियांग महामार्ग सर्वात जवळ आहे. रणगाड्यांनी मुसंडी मारली तर काही वेळातच हा महामार्ग भारतीय सैन्याच्या ताब्यात येऊ शकतो. चीनचा सर्व भर हा डेपसांगवर आहे, पण आता डेमचोक भागात भारतीय रणगाडे आल्याने चीनला आपला तिबेट महामार्ग सुरक्षित करण्यासाठी आणखी जमवाजमव करावी लागेल. आता दोन्ही देशांनी सीमेवर नव्याने सैन्य आणू नये असे ठरले आहे, त्यामुळे चीनला एकतर सैन्य आणता येणार नाही किवा मग समझोता मोडून सैन्य आणावे लागेल.
चीनने डेपसांग व स्पँगूरच्या मैदानी भागात हलके रणगाडे आणले आहेत. हे रणगाडे वजनाने हलके आहेत, पण त्यांचे कवच मजबूत नाही असे भारतीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उलट टी -७२ व टी- ९० हे रणगाडे भरभक्कम आहेत व ते उणे ४० तापमानात काम करू शकतात. हे रशियन बनावटीचे रणगाडे असल्यामुळे त्यात हिटर बसवलेले आहेत, त्यामुळे रणगाड्यातील सैनिकांना थंडीचा त्रास होणार नाही. या अशा चालींमुळे चीनला युद्ध करणे अवघड होत जाणार आहे. डेपसांग भागात चीनचा वरचष्मा दिसत असला तरी भारताची तयारी तुल्यबळ आहे, त्यामुळे तेथे दोघांनाही समसमान संधी आहे. फिंगर भागात आता चीनचे वर्चस्व राहिलेले नाही तर पँगाँग त्सो, स्पँगूर, चुशुल, डेमचोक हा सर्व भाग भारतीय वर्चस्वाचा आहे.
भारताने लडाख भागात एक वर्षभर मुक्काम ठोकता येईल एवढी अफाट रसद व साधनसामुग्री जमवली आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गोठवणाऱ्या थंडीला तोंड देण्याची भरभक्कम तयारी केली आहे. बघू आता पुढे काय होते.