चीनने १९५९ च्या दावारेषेचा प्रस्ताव पुढे करून मेलेल्या मढ्यात पुन्हा जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने हा मुद्दा पुढे करुन नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे?
– दिवाकर देशपांडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सामरिकशास्त्राचे अभ्यासक आहेत)
चीनने १९५९ च्या दावारेषेचा प्रस्ताव पुढे करून मेलेल्या मढ्यात पुन्हा जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. १९६२च्या युद्धाआधी म्हणजे १९५९ साली चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी भारताचा एक मोठा दौरा केला होता, या दौऱ्यात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु व त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन १९५९ची दावारेषा म्हणून आता प्रसिद्ध असलेली तडजोडीची योजना मांडली होती. या योजनेनुसार चीन पूर्व भागात म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात मॅकमोहन रेषेला मान्यता देऊन स्थिती आहे तशी ठेवण्यास तयार होता, पण पश्चिम भागात म्हणजे लडाख -अक्साईचीन भागात ब्रिटिशांनी आखलेली जॉन्सन रेषा मान्य करण्यास तयार नव्हता, त्याऐवजी त्याने नवा प्रस्ताव दिला होता, ज्यात संपूर्ण अक्साई चीन आणि लडाखचा बराचसा भाग चीनच्या ताब्यात जाणार होता. या प्रस्तावाबाबत भारतात संमिश्र प्रतिक्रिया त्यावेळी होती.
पण नेहरु मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री व विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा या तडजोडीस विरोध होता, कारण यात भारताचा दावा असलेला बराच भूभाग चीनच्या ताब्यात जाणार होता. त्यामुळे नेहरुंनी या तडजोडीला नकार दिला. याचा परिणाम १९६२चे युद्ध होण्यात झाला आणि या युद्धात चीनने त्याला हवा असलेला बराचसा भूभाग जिंकून घेतला. अर्थात चीनने हा भाग जिंकून घेतला असला तरी भारताने या भागावरचा आपला दावा कधीच सोडला नाही. त्यामुळेच पुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ठरवणे, या रेषेवर शांतता ठेवण्यासाठी व सीमा नियोजन करण्यासाठी १९९३, १९९६ व २००३ साली करार करणे, शिवाय सीमानिश्चितीसाठी उच्चस्तरिय समिती नेमणे हे प्रकार झाले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर जेवढ्या भेटी झाल्या त्या सर्व भेटीत ‘चायपर’ जी काही ‘चर्चा’ झाली त्यात हा प्रश्न चर्चिला गेला, पण लडाख आणि अक्साई चीनवरचा दावा सोडणार नाही ही भारताची भूमिका ठाम राहिली. थोडक्यात १९५९ पासून आता २०२० पर्यंत भारताच्या या भूमिकेत सातत्य आहे आणि या भूमिकेपासून भारत तसूभरही मागे हटण्यास तयार नाही, त्यामुळे चीनचा धीर सुटत चालला आहे. आता नियंत्रण रेषेवर लष्करी ताण निर्माण करून भारतावर ही दावा रेषा मान्य करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. भारताने हा प्रस्ताव मान्य नाही केल्यास केंद्रशासित प्रदेशाचा लडाखचा नवा दर्जा चीन मान्य करणार नाही तसेच अरुणाचलवर व तवांगवर चीन पुन्हा दावा सांगेल अशी धमकी देण्यात येत आहे.
२९-३० ऑगस्टच्या रात्री भारताने कैलास श्रेणीतील सर्व शिखरे ताब्यात घेतल्यानंतर १९५९ च्या दावारेषेचा प्रस्ताव प्रथम आला तो एका डिजिटल न्यूज पोर्टलवरील एका लेखातून. माजी ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात हा प्रस्ताव चीनकडून येण्याची शक्यता आहे, असे सूचित केले होते. या लष्करी अधिकाऱ्याला हे कसे कळले हे कळायला मार्ग नाही, पण चीनने त्यांच्या पद्धतीने ही बातमी पेरली असे म्हणावे लागेल. पण या लेखाची ना भारत सरकारने दखल घेतली ना भारतीय प्रसार माध्यमांनी घेतली. त्यामुळे मग एका चिनी राजकीय विश्लेषक विदुषीमार्फत या प्रस्तावाचे सूतोवाच करण्यात आले, त्याचीही कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता चिनी परराष्ट्र खात्यानेच आपल्या अधिकाऱ्यामार्फत हा प्रस्ताव मांडला, त्यामुळे त्याची आता औपचारिक दखल घेऊन भारत सरकारने अधिकृतरित्या हा प्रस्ताव फेटाळला आहे.
हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे आता चीन वेगळे काय करणार..? सीमेवर भारताने मोठ्या प्रमाणात सैन्य व युद्धसामुग्री गोळा करून दीर्घकाळ चिनी सेनेसमोर सुसज्जपणे उभे रहायचे ठरवले आहे, त्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. चीनला आपले काम आटोपून परत जायचे होते, पण आता भारतीय सैन्य जितका काळ सीमेवर राहील तितका काळ चीनला आपले सैन्य तिथे ठेवावे लागणार आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनविरोधी आघाडी सुरू झाली तरी चीनला आता हिमालयातील सैन्य, दारुगोळा व लढाऊ विमाने मागे नेता येणार नाही. चीनची सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती हिंदी महासागरात.
हिमालयात काहीही घडले तर त्याचे पडसाद हिंदी महासागरात उमटणार हे आता स्पष्ट झाले आहे. येत्या आठवड्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत व तेथेच क्वाड गटाची बैठकही होणार आहे. क्वाडच्या हालचालींमुळे चीन अस्वस्थ आहे. पाकिस्तानमार्फत दुसरी आघाडी उघडून क्वाडच्या हालचालींना आव्हान देण्याची शक्यता चीन चाचपडत होता, पण ते शक्य नाही हे चीनच्या लक्षात आले आहे.
एक गोष्ट नक्की आहे, ती ही की, भारत-चीन सीमाप्रश्नावर लष्करी मार्गाने तोडगा काढण्याचा चीनचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. उलट त्यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा होणार आहे. चर्चेने व देवाणघेवाणीने हा प्रश्न सुटू शकतो पण तेवढा धीर जग जिंकण्यास निघालेल्या शी जिनपिंग यांच्याकडे आहे का हा प्रश्न आहे.