नवी दिल्ली – भारताच्या इलेक्ट्रॉनिक बाजारातील मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. दक्षिण कोरियाच्या सॅमसंगने सप्टेंबरच्या तिमाहीत चीनच्या शाओमीला मागे टाकत दोन वर्षानंतर पुन्हा भारतीय बाजारपेठेत उंची गाठली. काउंटर पॉइंटच्या अहवालात हा मुद्दा समोर आला आहे. चीन आणि भारतातील वाढता तणाव आणि अमेरिकेत चिनी कंपन्यांवरील बंदीचा फायदा सॅमसंगला झाला असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, सॅमसंगने नवीन उत्पादनांच्या आधारे चिनी कंपन्यांना हरवले आहे.
ऑनलाईन विक्रीच्या आधारे सॅमसंगनेही बाजारात अव्वल स्थान राखले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीची विक्री दुपटीने ३० टक्क्यांवर गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत सॅमसंगच्या ऑनलाइन विक्रीत १५ टक्के हिस्सा होता. बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याव्यतिरिक्त सॅमसंगच्या एम आणि ए मालिकेच्या स्मार्टफोननेही ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्याचप्रमाणे सॅमसंगचे जागतिक उत्पन्न सर्वकाळ पातळीवर पोहोचले आहे. सॅमसंग कंपनीने म्हटले आहे की, सप्टेंबरच्या तिमाहीत त्याचा नफा १२.५० अब्ज डॉलरच्या किंवा दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे १०.८९ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. संगणक मेमरी चिप्स, स्मार्टफोन आणि उपकरणांच्या विक्रीच्या आधारे कंपनीचा नफा वाढला आहे. या कालावधीत, कंपनीचा महसूल आठ टक्क्यांनी वाढून ५९ अब्ज डॉलर्स इतका सर्वोच्च झाला.ही कोणत्याही तिमाहीत सॅमसंगची सर्वाधिक कमाई आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९ या साथीचा रोगाचा सर्व देशभरात उद्रेक सुरू असतानाही, काही काळा नंतर अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे ग्राहकांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. या कंपनीने म्हटले आहे की, संगणक चिप्सची मागणी कमी झाली असून स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाली आहे. यामुळे, सध्याच्या तिमाहीत त्याचा नफा कमी होणे अपेक्षित आहे.