नवी दिल्ली ः भारत आणि युरोपीय संघांमधील शास्त्रीय आणि तंत्रज्ञान सहकार्य विषयक कराराचे पुढील पाच वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आले आहे. या करारावर २३ नोव्हेंबर २००१ रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर २००७ आणि २०१५ मध्ये दोन वेळा नूतनीकरण देखील करण्यात आले होते.
यामुळे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनात सहकार्याचा विस्तार होईल आणि सामाईक हितसंबंध असलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्याने काम करण्याच्या घडामोडींना बळकटी मिळेल आणि आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या फायदे होतील. एकत्र केलेल्या कामामुळे भारतीय संशोधन आणि युरोपीय संशोधन संस्था संशोधन, तांत्रिक विकास आणि यात परस्पर सहकार्य करू शकतील.
हे आहेत क्षेत्र
या करारांतर्गत भारत आणि युरोपीय संघामध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण सहकार्य आहे आणि ते गेल्या काही वर्षात निरंतर वाढत आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये, स्वस्त आरोग्य सेवा, पाणी, ऊर्जा, अन्नधान्य आणि पोषण यासारख्या सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत – युरोपीय संघांच्या संशोधन तंत्रज्ञान विकास प्रकल्पांमधील सहगुंतवणुकीचा दर वेगाने वाढत आहे, ज्याचा परिणाम म्हणून कित्येक तंत्रज्ञान, पेटंट विकास, त्यांचे फायदेशीर उपयोग, संयुक्त संशोधन प्रकाशने, संशोधन सुविधा सामायिक करणे आणि दोन्ही बाजूचे वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांची देवाण घेवाण या सारख्या गोष्टींमध्ये वाढ झाली आहे.
संधी उपलब्ध होणार
हे सहकार्य पाणी, हरित परिवहन, ई-गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, प्रदूषणविरहीत अर्थव्यवस्था, जैव अर्थव्यवस्था, आरोग्य आणि आयसीटी यावर केंद्रित आहे. मानवी विकास आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात युरोपीय संघ आणि भारत आघाडीवर आहेत. भारतासाठी, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, ज्यात कमी खर्चातील काल्पनिक नाविन्यपूर्ण गोष्टी समाविष्ट आहेत आणि उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वाढ करणे ही दोन उद्दिष्ट्ये आहेत. दोन्ही क्षेत्र युरोपिय संघ – भारत सहकार्यासाठी परस्पर फायदेशीर संधी उपलब्ध करून देतात.