होमरूल लीग चळवळीच्या प्रणेत्या
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
बरोबर एकशे पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. इ. स. 1915 मध्ये मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. यावेळी एकामागून एक दिग्गज पुढारी हे भारतीय स्वातंत्र्यासंबंधी आपआपले विचार मांडत होते. तरीही जहाल आणि मवाळ अशा गटांमुळे मतभेद शिगेला पोहोचतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. थोडा गोंधळ उडाला, गडबड होऊ लागली, याच वेळी एक आयरिश वंशाच्या बाई उभ्या राहिल्या आणि कडाडल्या, “ऐका सज्जनहो, जात, धर्म, प्रांत, जहाल, मवाळ असा कोणताही भेद आपणाला आजच्या घडीला परवडणारा नाही, आपले सर्वांचे ध्येय एकच हवे, ते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य. ‘होमरुल लीग’ म्हणजेच स्वतःच्या देशात स्वतःचे कायदे हवेत. यासाठी आपल्याला एकात्म आणि संघटित व्हावे लागेल.” सर्व सभेत एकच शांतता पसरली. सर्वजण एकमेकांकडे बघू लागले, कोण आहेत या बाई? त्या होत्या होमरूल लीग चळवळीच्या प्रणेत्या आणि थिऑसॉफीकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. ॲनी बेझंट. पुढे दोनच वर्षांनी इ. स. 1917 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष बनल्या. जन्माने पाश्चात्य असून सुमारे चार दशके भारतात राहून त्यांनी भारतमातेची सेवा केली.
डॉ. अॅनी बेझंट यांनी आपल्या कार्याचा ठसा केवळ राजकीय क्षेत्रातच उमटविला असे नव्हे तर शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
अॅनी बेझंट यांचा जन्म दि. 1 ऑक्टोबर 1847 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील विल्यम पेजवुड आणि आई एमिली हे धार्मिक वृत्तीचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपल्याने अॅनी यांच्या आईने तिला शिक्षणासाठी दूर पाठवले. आईच्या मैत्रिणीकडे राहून अॅनी यांनी जर्मन, फ्रेंच आणि संगीत विषयाचा अभ्यास केला. त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा रेव्हरंट फ्रँक बेझंट यांच्याशी विवाह झाला. त्यांचे पती ख्रिस्त धर्मोपदेशक होते. परंतु वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडला.
याच काळात त्या नॅशनल सेक्युलर सोसायटीच्या सदस्य झाल्या आणि पुढे उपाध्यक्ष झाल्या. त्यांचा जॉर्ज बर्नार्ड शॉ, पेथिक लॉरेन्स, सिडने वेब अशा विचारवंतांशी परिचय झाला. पुढे त्या नॅशनल रिफार्मर या वृत्तपत्राच्या सहसंपादक झाल्या. न्यूयॉर्क येथे दि. 7 सप्टेंबर 1975 रोजी स्थापन झालेल्या ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ या संस्थेच्या कार्याशी त्या जोडल्या गेल्या कर्नल ऑल्कॉट आणि मादाम ब्लाव्हाटस्की या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक होते. अज्ञात आणि अमूर्त अशा निसर्ग सत्याचा शोध घेणे, मानवी जीवनातील अव्यक्त क्षमतांचा वेध घेणे आणि जगातील सर्व धर्म आणि संस्कृतींचा अभ्यास करणे हे या सोसायटीचे मुख्य कार्य होते. प्रत्यक्ष ध्यानयोग ही संस्थेची साधना होती.
याच काळात इ. स. 1893 मध्ये दक्षिण भारतातील अड्यार येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात येऊन त्याच्या प्रमुख म्हणून अॅनी बेझंट यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे भारतात आगमन झाले आणि तेव्हापासून पुढील चाळीस वर्ष त्या भारतमातेच्या कन्या बनून राहिल्या. येथील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य सुरु केले. भारतात आल्यावर पहिल्याच स्वागत सभेत त्या म्हणाल्या, “मी परदेशातून भारतात आले तरी मी जन्मोजन्मी भारतीय आहे, कर्माने मी भारतीय असून येथील माता बांधवांच्या सेवेसाठी अखंड कार्य करीत राहील.” आणि खरोखर त्यांनी भारत दौरा सुरू केला.
गावोगावी जाऊन त्या व्याख्याने देऊ लागल्या. थिऑसॉफी हे जगाच्या कल्याणाचा विचार करणारे तत्वज्ञान आहे हे लोकांना पटू लागले. भारत हा तर विश्वकल्याणाचा विचार करणारा अध्यात्मिक देश होता.
कालांतराने अॅनी बाई यांनी 1998 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. याच कॉलेजचे रूपांतर पुढे बनारस हिंदू विद्यापीठात झाले. अर्थात या कार्यात पंडित मदनमोहन मालवीय, गोविंद दास, श्रीप्रकाश आदींचे योगदान मोलाचे ठरले. शिक्षण आणि अध्यात्मिक क्षेत्रात अॅनी बाईंचे कार्य सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. परंतु कालांतराने जे. कृष्णमूर्ती आणि त्यांच्यात मतभेद झाले आणि दोघांचे मार्ग भिन्न झाले. दरम्यान बाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश करून आपला ठसा उमटवण्यात सुरुवात केली.
सभांमागून सभा त्या घेऊ लागल्या. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आदी नेत्यांशी चर्चा करू लागल्या. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली. त्यानंतरच 1917 मध्ये कलकत्ता येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना त्या म्हणाल्या, “इंग्रजांनी मला अटक केली, जेलमध्ये टाकले, पायदळी तुडविले, पण भारतीयांनी माझा सन्मान केला. चला सर्व मिळून म्हणूया ‘वंदे मातरम’, हाच आजपासून आपला स्वातंत्र्याचा नारा, आता मागे हटायचं नाही, पुढे जायचे आहे.” त्यानंतर त्यांचे महात्मा गांधींशी काही मतभेद झाले.
भारतीय राजकारणात पुढे गांधीयुग सुरू झाले. मात्र भारतीय राजकारण असो की धर्म, अध्यात्म, शिक्षण आदि क्षेत्रात अॅनी बेझंट यांचे कार्य अत्यंत मोलाचे मानले जाते. अशा या जन्माने पाश्चात्य पण कर्माने भारतीय विदुषीने 20 सप्टेंबर 1933 रोजी अड्यार येथे आपल्या आश्रमात जगाचा अखेरचा निरोप घेतला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)